प्रकृती चिंताजनक; पुणे येथे उपचारासाठी हलवले
सातारा : काही दिवसांपूर्वी सातारा येथील राजवाडा परिसरात झालेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच आज सायंकाळच्या सुमारास प्रतापगंज पेठ येथील एका पतसंस्थेसमोर एकावर शस्त्राने वार करण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आज सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील प्रतापगंज पेठेत असणाऱ्या एका पतसंस्थेसमोर आयर्न बापू भोसले, रा.शाहूपुरी परिसर, सातारा (पूर्ण पत्ता समजू शकला नाही) या युवकावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ राधिका रोड वरील यशवंत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे. पण प्रकृती चिंताजनक बनत असल्यामुळे त्याला तात्काळ पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या संदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार जाधव यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारची घटना घडली आहे. मात्र अद्याप तक्रार दाखल झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.









