मिरज :
मालगांव ( ता. मिरज ) येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणातून मुलीच्या मामासह आई–वडिलांनी व नातेवाईकांनी लोखंडी रॉड आणि काठ्या घेऊन लग्नाच्या वऱ्हाडावरच हल्ला केला. नव वधू–वरांसह लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांनाही जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पाचजण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी दादासो तुकाराम वाघे (रा. तासगांव) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत परस्पर विरोधी तक्रारी घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांपैकी काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या मारहाणीत शिवाजी खरात, सानिका खरात, राजाक्का बरखडे, शालाबाई वाघे, सुनिता कोळेकर असे पाचजण जखमी झाले. तर मुलीचे नातेवाईक असलेल्या अमोल कोळेकर, अनिल कोळेकर, साहिल कडते, सागर कडते, संगीता कडते, मोहिनी कोळेकर, रत्नाबाई कोळेकर यांनी संगनमत करत वऱ्हाडावर हल्ला कऊन मारहाण केल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात देण्यात आली आहे. या घटनेने मालगांवसह परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मालगांव येथे कबाडगे स्टोअरेजजवळ राधाकृष्ण मेथे मळा येथे प्रेमविवाह झाला होता. मुलाचे नातेवाई&क लग्नासाठी मालगांवमध्ये आले होते. मालगावातीलच मुलगीशी प्रेमविवाह केल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी विरोध दर्शविला होता. तरीही हा विवाह लावून दिल्याच्या कारणातून मुलीच्या नातेवाईकांनी थेट वऱ्हाडावरच हल्ला चढविला. मुलाचे नातेवाईक असलेल्या दादासो तुकाराम वाघे यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. मारहाणीत जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वाघे यांच्या तक्रारीनुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मात्र, मुलीच्या नातेवाईकांकडूनही परस्पर विरोधी फिर्याद देण्यासाठी तगादा लावला जात होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. मारहाण करणाऱ्यापैकी काही संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादी घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.








