वृत्तसंस्था/ वॉशिंटन
अमेरिकेतील कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसी यांचे पती पॉल यांच्यावर सॅन फ्रॅन्सीस्को येथे हल्ला करण्यात आला आहे. पॅलोसी यांचे निवासस्थान फोडून हल्लेखोराने आत प्रवेश केला आणि त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लेखोराला अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे.
या हल्ल्याची माहिती डेमोक्रेटीक पक्षाचे प्रवक्ते ड्रय़ू हॅमिल यांनी शुक्रवारी दिली. ही घटना अत्यंत गंभीर असून तिची सर्व बाजूंनी चौकशी केली जाईल. हल्लेखोराला पकडण्यात आले असून त्याच्याकडून हल्ल्याची कारणे जाणून घेतली जात आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता प्रथमदर्शी दिसत नसली तरी चौकशी करताना ही शक्यताही गृहित धरली जाणार आहे.
हा हल्ला राजकीय दृष्टय़ा प्रेरीत होता का याचीही चौकशी सुरु असून येत्या काही दिवसांमध्ये या हल्ल्याचे गुढ उलगडेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. पॉल पॅलोसी हे आर्थिक क्षेत्रातील उद्योजक असून 82 वर्षांचे आहेत. त्यांच्या वरील हल्ल्यासंबंधात अमेरिकेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.









