वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानातील एका भारतीय चौकीवर हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही चौकी भारताने सोडून दिलेली होती. मात्र, तिथे काही स्थानिक कर्मचारी काम करीत होते. त्यांच्यापैकी काहीजण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या चौकीमध्ये कामासाठी जात असलेल्या स्थानिक अफगाणी कर्मचाऱ्यांच्या वाहनावरही हातगोळे फेकण्यात आले असे वृत्त आहे. या हल्ल्यांमध्ये कोणीही भारतीय नागरिक जखमी झाला नाही. कारण येथे कोणत्याही भारतीयाची उपस्थिती नव्हती. ही चौकी जलालाबाद येथील आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर त्वरित ही चौकी रिकामी करण्यात आली होती. मात्र, काही स्थानिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती चौकीच्या देखभालीसाठी करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.









