खलिस्तानी समर्थकांनी केली तोडफोड
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा एकदा एका हिंदू मंदिराला लक्ष्य केले आहे. खलिस्तानी समर्थकांनी शनिवारी ब्रिस्बेनमधील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. भाविक सकाळी मंदिरात पूजेसाठी पोहोचले असता त्यांना मंदिराच्या भिंतीला तडे गेल्याचे दिसून आले अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ऑस्ट्रेलियात राहणाऱया हिंदूंना घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा दावा हिंदू ह्युमन राईट्सच्या संचालिका सारा गेट्स यांनी केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर हिंदूंच्या भावना दुखावण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कॅरम डाउन भागात असलेल्या श्री शिव विष्णू मंदिरावरही भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. तसेच जानेवारी महिन्यातच ऑस्ट्रेलियातील मिली पार्क परिसरातील स्वामीनारायण मंदिरावर भारतविरोधी घोषणा लिहिण्याची घटनाही समोर आली होती. तत्पूर्वी मेलबर्नमधील इस्कॉन मंदिराचीही तोडफोड करण्यात आली होती. हिंदू मंदिरांची तोडफोड आणि भारतविरोधी घोषणा लिहिल्याचा मुद्दाही भारत सरकारकडून ऑस्ट्रेलिया सरकारसमोर मांडण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.









