काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये शनिवारी एका गुरुद्वारावर हल्ला झाला. या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकासह दोन अफगाण नागरिक ठार झाले. या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेटच्या खोरासान मॉडय़ुलचा (आयएस-के) हात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची जबाबदारी आतापर्यंत कोणीही स्वीकारलेली नाही. भारताने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अफगाणस्थित भारतीय शीख समुदायाची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.
स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळी 7.30 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30) काबूलमधील गुरुद्वारा कर्ते-परवानच्या गेटबाहेर दोन स्फोट झाले. यानंतर गुरुद्वाराच्या आवारातही दोन स्फोट झाले. आतमध्ये झालेल्या स्फोटामुळे गुरुद्वाराला लागून असलेल्या काही दुकानांना आग लागल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ आणि धावपळ उडाली होती.









