मालमत्ता खरेदीवर घातली बंदी ः पंतप्रधान ट्रुडो यांचा निर्णय
वृत्तसंस्था / टोरंटो
नव्या वर्षात कॅनडामधील जस्टिन ट्रुडो सरकारने विदेशी नागरिकांना मोठा झटका दिला आहे. भारतीयांसह कॅनडात गेलेला कुठलाही विदेशी नागरिक आता तेथे मालमत्तेची खरेदी करू शकणार नाही. कॅनडाने यापूर्वी स्टडी अन् पीआर व्हिसासाठी अर्ज करणाऱयांना झटका दिला होता. मागील वर्षी मोठय़ा संख्येत व्हिसा अर्ज फेटाळण्यात आले होते.
घरांच्या कमतरतेला तोंड देणाऱया कॅनडाने नागरी मालमत्ता खरेदी करणाऱया विदेशी नागरिकांवर बंदी घातली आहे. ही बंदी नव्या वर्षात लागू झाली आहे. कॅनडा सरकारने हा नियम लागू करण्यासह ही बंदी केवळ शहरांमधील घरांकरता लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. समर कॉटेज सारख्या मालमत्तांवर ही बंदी लागू होणार नाही.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 2021 मधील निवडणूक प्रचारादरम्यान लोकांच्या सुविधेसाठी मालमत्तेसंबंधी हा प्रस्ताव मांडला होता. कॅनडात वाढत्या किमतींमुळे अनेक लोकांना घर खरेदी करणे अशक्य ठरले होते. स्थानिक लोकांना लाभ व्हावा म्हणून आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॅनडात घर खरेदी करणाऱयांची मागणी मागील काही काळापासून मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. विदेशी नागरिक कॅनडात घर खरेदी करून ते अधिक किंमतीत विकत आहेत. घर हे लोकांना राहण्यासाठी आहे, गुंतवणुकदारांसाठी नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने बिगर-कॅनेडियन अधिनियमाच्या अंतर्गत नागरी मालमत्ता खरेदी करण्यावर बंदी लागू केली आहे.









