एअरफोर्स मेसमधील सर्व्हिसमनचे कृत्य
वृत्तसंस्था/ पठाणकोट
पंजाबच्या पठाणकोट एअरफोर्समध्ये तैनात महिला स्क्वाड्रन लीडर अर्शिता जायस्वाल यांच्यावर हल्ला झाला आहे. एअरफोर्स मेसमध्ये काम करणाऱ्या एका सर्व्हिसमनने केलेल्या या हल्ल्यात महिला स्क्वाड्रन लीडर गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यासाठी त्याने धारदार शस्त्राचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी सर्व्हिसमनला अटक केली. सध्या स्क्वाड्रन लीडरची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना अधिक उपचारासाठी चंदीगडला रेफर करण्यात आले आहे.
पंजाब पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास हाती घेतला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुऊवात केली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी एअरफोर्स मेसमध्येच सर्व्हिसमन म्हणून तैनात असलेल्या एका आरोपीला अटक केली. पठाणकोट पोलीस आता हल्लेखोराची चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे की नाही याबाबतही शहानिशा केली जात आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.









