तरण तारण / वृत्तसंस्था
पंजाबमधील तरण तारण येथे एका चर्चवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चर्चमधील येशू ख्रिस्ताच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला. मेरी मातेच्या पुतळय़ाचीही हानी झाली आहे. चर्चच्या पास्टरची कार पेटवून देण्यात आली व चर्चचीही नासधूस करण्यात आली.
ही घटना गेल्या सोमवारी दादुआना खेडय़ात घडली. त्यानंतर मंगळवारी तक्रार सादर करण्यात आली. अज्ञातांच्या एका गटाने चर्चमध्ये घुसून नासधूस केली. येशू ख्रिस्त आणि मेरिमाता यांचे पुतळे फोडण्यात आले. पास्टरच्या कारला आग लावण्यात आली. हा प्रकार सुमारे 15 मिनिटे सुरू होता. चर्चच्या इमारतीची फारशी हानी झालेली नाही. तसेच रक्तपातही झालेला नाही. मात्र, या हल्ल्यामुळे ख्रिश्चनांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे.
या संबंधात सादर करण्यात आलेल्या तक्रारीत निहंग समुदायातील काही व्यक्तींवर आरोप करण्यात आले आहेत. या चर्चमध्ये सोमवारी कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात घुसून उपस्थितांना धमकाविण्यात आल्याचा आरोप आहे. निहंगांचा जथ्था गावात आल्यानंतरच ही घटना घडल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर चार असावेत, असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे.
लोकांना बाटविल्याने तणाव!
या खेडय़ात आणि आसपासच्या प्रदेशात ख्रिश्चन धर्मगुरु आणि चर्चेसच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात शीख आणि हिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यात येत आहे. विविध आमिषे दाखवून करण्यात येत असलेले हे धर्मांतर बेकायदेशीर आहे, असा आरोप शीख धर्मपीठाच्या अधिकाऱयांनी केला आहे. चर्चवरील हल्ल्यात कोणत्याही शीख संघटनेचा हात नाही. मात्र, ख्रिश्चन धर्मगुरुंनी चालविलेल्या बेकायदा धर्मांतर मोहिमेची ती प्रतिक्रिया असावी, असे मत व्यक्त होत आहे.









