अंदाधुंद गोळीबार : चकमकीत 9 पाकिस्तानी जवानांसह 4 नागरिक ठार झाल्याचा दावा
वृत्तसंस्था/ ग्वादर (बलुचिस्तान)
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादरमध्ये रविवारी सशस्त्र हल्लेखोरांनी चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. आपल्या माजीद ब्रिगेडमधील दोन आत्मघाती हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यादरम्यान झालेल्या चकमकीत 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी लष्करी जवानांसह एकूण 13 जण ठार झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराचीतील चिनी वाणिज्य दुतावासाने चिनी नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा चिनी नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सशस्त्र हल्लेखोरांनी ग्वादर पोलीस चौकीजवळ चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त हाती घेतला आणि दोन तासांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. या हल्ल्यात 4 चिनी नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्युत्तरादाखल दोन हल्लेखोर ठार झाले आहेत.
ग्वादरमधील हल्ल्यात मजीद ब्रिगेडचे दोन सदस्य दश्त निगोरचे नावेद बलोच उर्फ अस्लम बलोच आणि गेशकोर अवरनचे मकबूल बलोच उर्फ कायम यांनी चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान 4 चिनी नागरिक आणि 9 पाकिस्तानी लष्करी जवान मारले गेले. तसेच अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. बीएलएने यासंबंधी विविध दावे करत हल्ल्याची जबाबदारीही स्विकारली आहे.
चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर सकाळी 9.30 वाजता हल्ला झाला आणि त्यानंतरही सुमारे दोन तास भीषण गोळीबार सुरू होता. ग्वादरमधील फकीर कॉलनीजवळ चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. ‘बलुचिस्तान पोस्ट’ या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ग्वादर या बंदर शहरात स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज ऐकू येत होत्या. त्यानंतर सुरक्षा विभागाकडून अलर्ट जारी करत घटनास्थळी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी शहराला हाय अलर्टवर ठेवले असून शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते बॅरिकेड्सने बंद केले आहेत.
कसा झाला हल्ला?
ग्वादरमधील फकीर कॉलनीतून चिनी अभियंत्यांचा ताफा जात असताना हा दहशतवादी हल्ला झाला. 23 चिनी अधिकाऱ्यांचा सहभाग असलेला तीन एसयूव्ही आणि एक व्हॅनचा वाहनताफा प्रकल्पाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. मात्र बुलेटप्रूफ वाहनांमुळे चिनी अभियंत्यांचे प्राण वाचले. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, व्हॅनजवळ आयईडी स्फोटही झाला होता. टार्गेट करण्यात आलेले चिनी अभियंते ग्वादर बंदर प्रकल्पात काम करत आहेत. जिओ न्यूजनुसार, चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या थर्मल पॉवर प्रकल्पासाठी चिनी अभियंते येथे उपस्थित आहेत.
चिनी नागरिकांवर यापूर्वीही हल्ले
गेल्यावषी मे महिन्यात, बुरखा परिधान केलेल्या बलूच महिला आत्मघाती हल्लेखोराने कराची विद्यापीठातील चिनी बनावटीच्या कन्फ्यूशियस संस्थेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसवर हल्ला केला होता. त्यात तीन चिनी नागरिकांसह चार जण ठार झाले. पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांवर गेल्यावषीचा हा पहिलाच मोठा हल्ला होता. तर जुलै 2021 मध्ये उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये अभियंत्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर बॉम्बस्फोट झाला होता. ज्यामध्ये 9 चिनी मजुरांसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. दबावाखाली पाकिस्तानने ठार झालेल्या चिनी मजुरांच्या कुटुंबीयांना लाखेंची भरपाई दिली होती. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी चीनने आपली टीम पाठवली होती. त्याचप्रमाणे, एप्रिल 2021 मध्ये, क्वेट्टामध्ये चिनी राजदूत राहत असलेल्या आलिशान हॉटेलवर आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात चार लोक ठार झाले होते.