बस थांबवून प्रवाशांचे अपहरण, ओळख पटल्यानंतर गोळीबार
वृत्तसंस्था/ क्वेट्टा
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गुरुवारी रात्री उशिरा सशस्त्र लोकांनी क्वेट्टाहून लाहोरला जाणारी प्रवासी बस थांबवत 9 प्रवाशांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार मारले. ही घटना उत्तर बलुचिस्तानमधील सर धक्का भागात झोबजवळ घडली. हा परिसर बऱ्याच काळापासून दहशतवादी कारवायांचे केंद्र आहे.
झोबचे साहाय्यक आयुक्त नवीन आलम यांच्या मते, हल्लेखोरांनी प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची ओळख पटवली आणि नंतर 9 जणांवर गोळ्या झाडल्या. सर्वांचे मृतदेह बरखान जिह्यातील रेखानी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. हल्लेखोर पूर्वनियोजित योजनेसह आले होते आणि ते लक्ष्यित हत्या करत होते, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.
भारत-समर्थित हल्ल्याचा आरोप
बलुचिस्तानचे प्रांतीय सरकार याला भारत-समर्थित हल्ला म्हणत आहे. या हल्ल्यामागे फितना अल-हिंदुस्तानचा हात असल्याचे सरकारने म्हटले आहे. मे महिन्यात पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानच्या सर्व बंडखोर संघटनांना फितना-अल-हिंदुस्तान असे नाव दिले. त्यापैकी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ही सर्वात मोठी आणि प्रमुख संघटना आहे.









