बेसबॉल बॅटद्वारे केली जबर मारहाण : मारहाण करणारे तिघेही अल्पवयीन मित्र,अमलीपदार्थ सेवनाचा प्राथमिक अंदाज
पणजी : अलीकडच्या काळात मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती आणि नशा वाढत चालली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कांपाल भागात घडलेली घटना आहे. या ठिकाणी तीन अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना घडली आहे. या घटनेतील जखमी मुलगा गंभीर अवस्थेत असून, त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ड्रग्ज व्यवहारातून हा जीवघेणा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाची मुलाच्या कुटुंबियांनी पणजी पोलिसात तक्रार दिली आहे. कापांल येथे मुलाचा आणि त्याच्या एका अल्पवयीन मुलाचा वाद सुरू होता. या वादाचे ऊपांतर मारहाणीत झाले. मारहाण करणाऱ्या मुलाच्या मदतीला आणखी दोघेजण आल्यानंतर या तिघांनी मिळून त्या अल्पवयीन मुलाला बेसबॉलच्या बॅटने बेदम मारहाण केली. यात मारहाणीनंतर मुलाला गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्तस्त्रावही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याची प्रकृती नाजूक आहे.
तीन दिवसांनंतर प्रकरण उघडकीस
मारहाणीचा प्रकार सुरू असतानाही काहीजणांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिघेही हल्लेखोर कुणाचे ऐकत नव्हते. या मुलांनी कोणतीतरी नशा करूनच बेसबॉलच्या बॅटने मुलाला मारहाणीचे धाडस केले असावे, असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या घटनेच्या तीन दिवसांनंतर काल बुधवारी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तीन दिवसानंतर अमलीपदार्थसंबंधी चाचणी घेतल्यास त्याचा अहवाल येणे अवघड असल्याने पोलिसांनी अमलीपदार्थासंबंधी चाचणी घेतलेली नाही. पणजी पोलिसांनी मारहाणीची घटना उघडकीस आल्यानंतर 15 ते 17 वयोगटातील तीन अल्पवनीय मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिघांवरही खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तिघांचीही मेरशी येथील अपना घर या सुधारगृहात रवानगी केली आहे.
तिन्ही अल्पवयीन मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेली तिन्ही अल्पवयीन मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे समजते. हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी या तिघांनीही प्रयत्न केले होते.
घटनेतील महत्त्वाच्या नोंदी
- मारहाणीत जखमी झालेला मुलगा व अन्य तिघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या सर्वांना गांजाचे व्यसन लागले होते, अशी पोलिसांची माहिती आहे.
- कांपाल ‘लेक ह्यू’ परिसरात जखमी मुलाला गांजा देतो, सांगून बोलविण्यात आले होते. त्यानंतर संशयित मुलाने त्याला बेसबॉल बॅटने मारहाण केली.
- जखमी मुलावर 18 वेळा बेसबॉल बॅटने हाणले आहे. हात, पाय व डोक्यावर मार बसल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाला. हात, पाय फ्रॅक्चर झाले.
- पोलिसांनी गोमेकॉत उपचार घेणाऱ्या जखमी मुलाची जबानी घेण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याने जबानी घेण्यास नकार दिला.








