अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला त्याच्या मूळ रुपाची ओळख करून देत आहेत. ते म्हणाले, वेदात सांगितल्याप्रमाणे निजात्मता किंवा आत्मस्वरूप, ही माणसाची असलेली खरी ओळख आणि समोर दिसणारी दुनिया, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु हे लक्षात न घेता तो स्वत:चा देह हीच त्याची ओळख आहे, असे मानतो. त्यामुळे तो समोर दिसणाऱ्या दुनियेतच रमतो. त्या त्याच्या दुनियेत त्याला अत्यंत प्रिय असलेल्या स्वत:च्या बायकामुलांसकट सर्वजण येतात. उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्था प्रपंचात येतात आणि जातात पण मूळ वस्तू म्हणजे आत्मस्वरूप आहे तसेच राहते. समोर निरनिराळ्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती दिसत असल्या तरी त्या तात्पुरत्या आहेत असं समज आणि ती माझीच रूपे आहेत हे लक्षात घे. अरे माझ्याशिवाय येथे कोणत्याही गोष्टीला थारा नाही. एकूण निर्माण झालेली वस्तू आणि ती निर्माण करणारा, तिचे पालन करणारा आणि नंतर संहार करणारा मीच आहे. मी प्रपंच निर्माण केला पण मी त्यात नसतो. त्यावर उद्धवाने भगवंताना अशी शंका विचारली की, देवा, जग प्रत्यक्ष डोळ्यांना दिसतंय मग तो केवळ आभास आहे असं कसं म्हणता येईल? भगवंत म्हणाले, अरे, काही काळ दिसणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात. त्या अव्यक्तातून येतात काही काळ येथे नांदतात आणि पुन्हा अव्यक्तात निघून जातात. ह्या सर्व गोष्टी त्रिगुणात्मक असतात. त्यामुळे त्या मायिक असतात. ज्या गोष्टी मायिक असतात त्या कधी ना कधी नष्ट होणाऱ्या असतात. मायेच्या प्रभावात गुंतल्याने माणसाला त्या खऱ्या आहेत असा भास होत असतो. त्यामुळे त्याला समोर दिसणारा प्रपंच खरं आहे असे वाटते. प्रपंच मिथ्या आहे हे लक्षात घेणे हेच खरे ज्ञान आहे. ह्याप्रमाणे जो सज्ञान झाला आहे तो सर्वांशी समत्वाने वागतो. त्यामुळे तो भुतांच्या गुणदोषांकडे ढुंकूनही पहात नाही की कुणाची निंदा किंवा स्तुती करत नाही. ज्याप्रमाणे अंधाराकडे दुर्लक्ष करून सूर्य आपल्या भेटीला येतो त्याप्रमाणे जगाच्या गुणदोषांकडे दुर्लक्ष करून साधुसंत त्यांचे काम करत असतात. हे जे आत्मज्ञानाचे लक्षण सांगितले ना तेच सिद्धांचे लक्षण होय कारण सिद्ध हा आत्मज्ञानी असतोच. ज्यांना आत्मज्ञान व्हावे असे वाटते त्यांना मुमुक्षु असे म्हणतात. तेव्हा मुमुक्षुनी आत्ता मी आत्मज्ञानी सिद्धाचे जे लक्षण सांगितले ते लक्षात ठेवून त्याप्रमाणे अनुसंधानात असावे. त्यासाठी कुणाचे गुणदोष पाहू नयेत आणि कुणाची निंदा अथवा स्तुती करू नये. संत मंडळी ही गोष्ट जाणून असतात म्हणून ते कुठ्ल्याही व्यक्तीचे गुणदोष पहात नाहीत तसेच कुणाची निंदा वा स्तुती करत नाहीत. मनुष्य म्हणून जन्माला येऊन जे आत्मोद्धारासाठी प्रयत्न करत नाहीत त्यांना ते नावे जरूर ठेवतात. भगवंतांचे हे मनोगत ऐकल्यावर तुकाराममहाराजांचा आयुष्य वाया घालवणाऱ्या मंडळींविषयी कळकळ व्यक्त करणारा अभंग जरूर आठवतो. उपकारासाठीं केले हे उपाय । येणेंविण काय चाड आम्हां?1। बुडतां हे जन न देखवे डोळा। येतो कळवळा म्हणउनि ।2।. पुढे भगवंत म्हणाले, जे जन्मतात आणि उद्धार होण्यासाठी काहीही न करता नाश पावतात ते रिकाम्या हातानेच परत जात असल्याने त्यांना पुन: पुन्हा जन्ममरणाच्या चक्रातून फिरावे लागते. उद्धवा ते सर्व असंत होत. म्हणून सर्व गोष्टींची आसक्ती सोडून उदास, विरक्तपणे जीवन व्यतीत करावे. ज्यांना कुणाला त्यांचा नश्वर देह वाढल्यावर आनंद होतो ते मूर्ख समज. कारण त्यांना मनुष्य जन्माचे रहस्य समजलेच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. ते माणसाच्या उत्पत्ती आणि विनाशातून काहीच शिकत नाहीत. तुझे तसे होऊ नये म्हणून तुला उत्पत्तीविनाशलक्षण समजावून सांगतो. ऐक, उद्धवा आपण समोर दिसणाऱ्या व्यक्तींच्या जन्ममृत्युचे साक्षीदार असतो. ह्यावरून आपण अनुमान काढू शकतो की, जे जे समोर दिसतंय ते ते नाश पावणारे आहे.
क्रमश:








