प्रतिनिधी/सातारा
दह्याट (ता.वाई) येथे आनंदा लक्ष्मण कदम यांना शेतीमध्ये मशागत करण्यास अडथळा आणल्याप्रकरणी आनंदा सखाराम धनावडे (रा. दह्याट), विलास प्रकाश देशमुख (रा. सिद्धनाथवाडी) यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आनंदा कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते त्यांच्या दह्याट येथे शेती गट क्रमांक 11/8 मध्ये मिनी रोटर घेवून शेतीमध्ये मशागत करण्यासाठी गेले असता त्यांच्या शेताच्या बांधावरील झाडांना जाहीर सुचनेचा बोर्ड लावून त्या मिळकतीचा आनंदा सखाराम धनावडे, विलास प्रकाश देशमुख यांनी ताबा घेतला आहे, अशी खोटी विधाने जाहीरात सुचना फलकावर नमूद केलेली होती. कदम यांच्या ताब्यातील मिळकतीमध्ये कसण्यास विरोध केला व जमिनीत अतिक्रमण केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याचा तपास वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे-खराडे या करत आहेत. दरम्यान, विलास देशमुख तरुण भारतशी बोलताना म्हणाले, आमची काही चुक नाही. आमची बाजू पोलिसांनी ऐकून घेतली नाही. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याची तक्रार आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : त्याने स्वतःला मारून ट्रक लुटल्याचे सांगितले, पोलिसांनी खाक्या दाखवताच आजऱ्यातील लुटीचा बनाव उघड









