अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या वागणुकीवर भारताची करडी नजर : पाकिस्तानची मानसिकता बदलणे अवघड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत शुक्रवारी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवर वक्तव्य केले. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. तेथे अल्पसंख्याकांना मिळणाऱ्या वागणुकीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच वेळोवेळी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. धर्मांधता आणि कट्टरवादी विचारसरणी असलेल्या देशाची मानसिकता आम्ही बदलू शकत नाही. अशा देशाची मानसिकता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही बदलता आली नव्हती. पाकिस्तानात हिंदूसमवेत अन्य धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि त्यांचे शोषण घडत असूनही तेथील सरकार स्वत:च्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कुठलीच पावले उचलत नसल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या विरोधात होत असलेले गुन्हे आणि अत्याचारावरुन विचारलेल्या प्रश्नाला जयशंकर यांनी उत्तर दिले आहे. फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये झालेल्या अत्याचाराच्या 10 प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला. सभागृहातील सदस्यांच्या भावनांबद्दल मी जाणून आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. फेब्रुवारी महिन्यात हिंदू समुदायावरील अत्याचाराच्या 10 घटना आणि शिख समुदायाशी संबंधित 3 घटना घडल्या. तर ख्रिश्चन समुदायाशी संबंधित एक प्रकरण होते. एका ख्रिश्चन व्यक्तीवर पाकिस्तानात ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता अशी माहिती जयशंकर यांनी दिली.
पाकिस्तानात शीख समुदायाशी निगडित तीन घटना घडल्या. एका प्रकरणात शीख परिवारावर हल्ला करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात जुना गुरुद्वारा पुन्हा उघडल्याप्रकरणी शीख परिवाराला धमकाविण्यात आले. अहमदिया समुदायाशी संबंधित दोन प्रकरणे होती. यात एका प्रकरणी अहमदियांच्या मशिदीला टाळे ठोकण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात 40 थडग्यांना वेगळे करण्यात आले होते असे जयशंकर यांनी सांगितले.
बांगलादेशात मागील वर्षी अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या 2400 घटना घडल्या आणि चालू वर्षात अशाप्रकारच्या 75 घटनांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या विदेश मंत्र्यांसमक्ष हा मुद्दा मी उपस्थित केला. आमच्या विदेश सचिवांनी बांगलादेशच्या दौऱ्यात देखील हा विषय उपस्थित केला. हिंसेच्या घटना भारत सरकारसाठी चिंतेचे कारण ठरल्या आहेत असे जयशंकर यांनी एका खासदाराच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल नमूद पेले आहे.
पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करतो. संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत आमच्या प्रतिनिधीने मानवाधिकारांचे उल्लंघन, अल्पसंख्याकांचा छळ आणि लोकशाहीवादी मूल्यांची गळचेपी करणे हे पाकिस्तानचे सरकारी धोरण असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान हा जागतिक स्तरावर बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश आहे. अशास्थितीत पाकिस्तान कुणालाही उपदेश करण्याच्या स्थितीत नाही. याचमुळे पाकिस्तानने स्वत:च्या लोकांना वास्तवदर्शी शासन आणि न्याय देण्यावर लक्ष द्यावे अशा शब्दांत जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
थरूर यांच्याकडून समर्थन
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवरून भारत सरकार चिंतेत आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यात कुठलीही द्विपक्षीय चर्चा होत नसल्याने समस्या आहे, अन्यथा आम्ही आमच्या चिंता थेट पाकिस्तानसमोर व्यक्त करू शकलो असतो आणि समस्येचे निवारण करण्याची मागणी करू शकलो असतो. विदेशमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे पूर्णपणे तथ्याला धरून होते आणि आमच्या शेजारी देशामंध्ये अत्यंत चिंताजनक स्थिती असल्याकडे आम्ही लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.









