भाजपलाही केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ लखनौ
बसप प्रमुख मायावती यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेस तसेच भाजपवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे मायावती यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर निशाणा साधला. तर काँग्रेस राज्यांमधील दलितांच्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मागील काही काळापासून भाजप आणि काँग्रेस हे परस्परांसोबत कोण मोठा हिंदुत्ववादी आणि हिंदुभक्त आहे हे दाखवून देण्यासाठी स्पर्धा करत आहेत. यातून दोन्ही पक्ष अन्य धर्मांची उपेक्षा करत असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही पक्षांचे कृत्य घटनेच्या विरोधात आहे. दोन्ही पक्षांनी अन्य समुदायांचीही काळजी घेणे योग्य ठरणार आहे. भारतात सर्व धर्मांचे लोक राहतात. बसप हा सर्व धर्माच्या लोकांना समान मानतो. काँग्रेसशासित राज्यांमध्ये दलितांवर अत्याचार होत आहेत. या राज्यांमध्ये दलितांचे शोषण होत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. चालू वर्षात अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी मायावती यांनी स्वत:चे भाचे आकाश आनंद यांना मोठी जबाबदारी दिली आहे. आकाश आनंद हे आता संबंधित राज्यांमध्ये बसपचे सह-समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.









