अनिल आजगावकर यांचे प्रतिपादन :
प्रतिनिधी/ बेळगाव
अनेक क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या अत्र्यांची शिक्षक ही बाजू दुर्लक्षित राहिली. आरंभीची 20 वर्षे त्यांनी शिक्षकी पेशात घालविली आणि आदर्श शिक्षक म्हणून ठसा उमटविला. नवशिक्षणाची आघाडी उघडून अत्र्यांनी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले, असे विचार स्तंभलेखक अनिल आजगावकर यांनी मांडले.
ते आचार्य अत्रे यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त प्रगतिशील लेखक संघ आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ‘आयार्च अत्रे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नवयुग वाचनमाला आणि अरुण वाचनमाला लिहिल्या. ही क्रमिक पुस्तके अनेक वर्षे वापरात होती. वाचन, गद्य-पद्य लिखाण, मराठी आणि इंग्रजी भाषेचा वापर, नाट्याकला, स्काऊट व समाजकार्य अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदांचे आयोजन करून शिक्षकांना शिकविण्याच्या पद्धती, मुलांचे मानसशास्त्र यावर धडे दिले. मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी अत्र्यांनी दर्जेदार बोधकथा लिहिल्या. शिक्षकांनी शिकविण्यापेक्षा मुलांच्या शिकण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे अत्र्यांचे धोरण होते, असेही आजगावकरांनी स्पष्ट केले. समारोप करताना प्रा. नाडगौडांनी अत्र्यांचे किस्से सांगितले. सूत्रसंचालन व आभार सागर मरगाण्णाचे यांनी मानले.









