आटपाडी / सूरज मुल्ला :
आटपाडीचे सुपुत्र डॉ. बजरंग कुंभार यांच्या कर्करोगावरील औषध संशोधन प्रकल्पाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 56 लाखांचा संशोधन निधी दिला आहे. स्तनाच्या कर्करोगाविरोधात नवीन टेक्निकच्या आधारे औषध शोधण्याच्या मोहिमेला बळ मिळाले आहे. आयसीएमआरने निधीच्या निमित्ताने संशोधनाला प्रोत्साहन दिल्याने डॉ. बजरंग कुंभार व टीमकडून कर्करोगावरील प्रभावी औषध संशोधनाचा भक्कम पाया रचला गेला आहे.
बजरंग कुंभार सध्या मुंबई येथील सुनंदन दिवाटिया स्कुल ऑफ सायन्स (एनएमआयएमएस युनिव्हर्सिटी) मध्ये डिपार्टमेंट ऑफ बायलॉजिकल सायन्स विभागात कार्यरत आहेत. संशोधक प्राध्यापक सेवा बजावत त्यांनी सहकाऱ्यांसह रक्ताच्या कर्करोगावरील ’कार–टी’ सेल उपचार पध्दतीमध्ये संशोधन केले. पेशींची रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे व सुधारीत पेशींबाबतचे त्यांचे संशोधन कर्करोगाविरोधी लढ्यात महत्त्वाचे ठरले.
दहा वर्षापासून यावर काम करणारे डॉ. कुंभार यांनी स्तनाच्या कर्करोगावरील प्रभावी औषध शोधण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्याअनुषंगाने मशीन लर्निंग, रचना आधारित औषध डिझाईन, इन व्हिट्रो दृष्टीकोन एकत्रित करून संशोधनाचा प्रकल्प कॉलेजच्या माध्यमातून आयसीएमआरकडे सादर केला. त्यातील शाश्वती, योग्यता, शक्यतांची पडताळणी करत आयसीएमआरने डॉ. बजरंग कुंभार व सहकारी डॉ. एकता खट्टर यांच्या प्रकल्पाला संशोधन निधी दिला. औषध शोधण्यासाठी संगणकाचा, एआय तंत्रज्ञानाचा आधार घेत 3 वर्षे संशोधन केले जाणार आहे. नैसर्गिकरित्या म्हणजे झाडांपासून निर्माण होणाऱ्या औषधांचे संशोधन आहे. नवीन तंत्रज्ञान आणि नवीन औषधांतून स्तनाच्या कर्करोगाविरोधात लढण्याचे औषधरूपी शस्त्र ते शोधणार आहेत.
सध्यापेक्षा चांगले औषध शोधण्याच्या जबाबदारी यानिमित्ताने आयसीएमआरने डॉ. कुंभार यांच्यावर संशोधन निधीव्दारे सोपविली आहे. जैवविज्ञानातील हे संशोधन नवीन औषध निर्मीतीसाठी लाभदायक ठरणार आहे. भारतात पॅन्सरचा फैलाव गतीने होत आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी प्रभावी संशोधन सुरू आहे. पॅन्सरला मात देणे शक्य आहे. त्यासाठी आपल्यातील प्रचलीत नैसर्गिक औषधीय वृक्षसंपदेचे महत्त्वाचे योगदान ठरत आहे. त्याच अनुषंगाने स्तनाच्या कर्करोगाविरोधात लढाई सुरू आहे. या लढाईत आटपाडीचा सुपुत्र अग्रभागी राहून संशोधन करत असल्याची बाब अभिमानास्पद ठरली आहे.
- अॅक्टर नकोत संशोधक हवेत
शिक्षणातून संशोधन आणि संशोधनातून शिक्षणाचा प्रवास खडतर असलातरी अशक्य नाही. सध्या सोशल मीडियावर अॅक्टरचीच भरती अधिक आहे. संशोधक आणि त्यांचे संशोधन सोशल मीडियावर आल्यास जनजागृती होण्यासह माहितीचा विस्तार होईल. संशोधन क्षेत्रात मोठे करिअर आणि वाव आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे. सोशल मीडियावर अॅक्टर बनण्याऐवजी संशोधक, संशोधन आल्यास त्याचा समाजाला मोठा लाभ होईल. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) संशोधन निधी देवुन स्तनाच्या कर्करोगाविरूध्द लढाईसाठी आमच्यावर सोपविलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सज्ज झालो आहोत.
डॉ.बजरंग कुंभार, मुख्य संशोधक








