आटपाडी उत्तरेश्वर देवाच्या यात्रेतील चित्र
आटपाडी/प्रतिनिधी
आटपाडीतील उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रेनिमित्त शेळ्या-मेंढ्यांच्या यात्रेला उत्साहात सुरूवात झाली. नवरदेवाला सजवून जशी सवाद्य वरात काढतात, त्या प्रमाणे फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मेंढ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बेधुंद होऊन नाचणारे मेंढपाळ व सजविलेल्या शेळ्या-मेंढ्यांनी आटपाडीचे रस्ते व बाजारस्थळ फुलून गेले.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हजेरीने मंगळवारी आटपाडीत शेळ्या-मेंढ्यांच्या यात्रेला सुरूवात झाली. सुमारे ८ ते ९ हजार शेळ्या-मेंढ्यांची आवक पहिल्या दिवशी पहायला मिळाली. आटपाडी बसस्थानकापासून वाजत-गाजत मेंढपाळांनी आपली लहान जनावरे यात्रा स्थळावर आणली. वाजंत्री, रंगबेरंगी रंगात सजलेल्या मेंढ्या, नवरा-नवरीच्या वरातासाठी असणाऱ्या गाडीला सजवून त्यात मेंढ्या, बकऱ्या बसवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत बुधंद होऊन नाचणारे मेंढपाळ व त्यांच्या जल्लोषाने यात्रेच्या उत्साहाला भरती आली. आटपाडी शहराच्या विविध चौकातून यात्रा स्थळावर जाणारे रस्ते मेंढ्यांच्या मिरवणुकीने गजबले होते. उत्तरेश्वर देवाच्या मंदिरात दर्शन घेऊन मेंढपाळ व मेंढ्यांचे जथ्थे बाजार पटांगण शुक ओढा परिसरातील बाजारस्थळी पोहचले. तेथे मेंढरांना खांद्यावर घेऊन बेधुंद नाचणारे मेंढपाळांचा जल्लोष पाहण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती.








