आटपाडी :
आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीवर प्रादेशिक वस्त्राsद्योग आयुक्तांच्या आदेशाने तब्बल 49 कोटी 84 लाख रुपयांचा शासकीय बोजा चढविण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने सूतगिरणी व्यवहारावर आक्षेप घेऊन वेळोवेळी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शासकीय भागभांडवल थकीत प्रकरणी सदरची कारवाई करण्यात आली.
या कारवाईची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी दिली. थकीत कर्ज प्रकरणी सांगली जिल्हा बँकेने सूतगिरणी ताब्यात घेतली होती. त्यानंतर बँकेने लिलाव काढला. लिलावानंतर अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीजने सदरची सूतगिरणी लिलावात घेतली.
सूतगिरणीची जागा प्लॉटींग करून विक्री करण्यात आली. त्यानंतर सूतगिरणी पुन्हा सहकार तत्वावर करण्यात आली आहे. हा संपूर्ण व्यवहार गोलमाल असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगत गतवर्षी विधान परिषदेत आटपाडी सूतगिरणीच्या व्यवहारावर आक्षेप घेतला. या अनुषंगाने सांगली जिल्हा बँकेचीही चौकशीची मागणी त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री, वस्त्रोद्योगमंत्री, सहकार मंत्र्यांकडे तक्रारी करून पडळकर यांनी सूतगिरणी विक्री आणि जागेचे व्यवहार याबाबत जाहिररित्या माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांच्यावर टिकाही केली होती. त्यामुळे आटपाडी सूतगिरणीचा विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि प्रतिष्ठेचा बनला होता.
तक्रारींच्या अनुषंगाने वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी वस्त्रोद्योगच्या प्रादेशिक उपायुक्त सोलापूर यांना थकीत शासकीय अर्थसहाय्य वसुलीसाठी आटपाडी सूतगिरणीच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश दिले होते. सूतगिरणीला राज्य शासनाकडून शासकीय भागभांडवल 24 कोटी 79 लाख 41 हजार इतके प्राप्त झालेले आहे. सूतगिरणीने यापैकी 2 कोटी 53 लाख 13 हजार 920 रूपये भरणा केलेला आहे.
सूतगिरणीकडे शासन निर्णयानुसार शासकीय भागभांडवल व व्याज असे एकुण 49 कोटी 84 लाख 21 हजार 901 रूपये थकीत आहे. त्यामुळे देशमुख सूतरिणीकडे असलेल्या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी सूतगिरणीच्या जमीनीवर शासनाच्या नावे बोजा चढविण्याचे पत्र आटपाडी तहसीलदारांना प्रादेशिक उपाआयुक्त उज्ज्वला पळसकर यांनी काढले होते. त्यानुसार आटपाडी सूतरिणीच्या तीन गटावर आयुक्त वस्त्रोद्योग महाराष्ट्र शासन यांचा बोजा चढविण्यात आला आहे.








