Bajar Samiti Election Tasgaon And Atpadi : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष , बेदाण्याचे माहेरघर असलेल्या तासगाव आणि डाळींब व खिलार जातीच्या जनावरांचे अन् माडग्याळ मेंढ्याचे एक प्रमुख विक्री केंद्र असणाऱ्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 12 पर्यंत 1426 एवढे मतदान झाले. तरआटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल व तोलाइतदारांचे 92 टक्के मतदान झाले. सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रकिया पूर्ण करुन लगेचच या दोन बाजार समितीची मतमोजणी सुरू होणार आहे. यामुळे आजच तासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे.
आटपाडी आणि तासगावात 12 वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान व टक्केवारी
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती
सहकारी संस्था गट 704 – 79 टक्के
ग्रामपंचायत गट 386 – 76 टक्के
अडते व व्यापारी 293 – 57 टक्के
हमाल व तोलाइतदार 83 – 92टक्के
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती
एकूण मतदान – 1946
आतापर्यंत झालेले मतदान – 1426
मतदान टक्केवारी – 73 टक्के
तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. याठिकाणी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत गेला आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील विरुद्ध स्वर्गीय आर. आर. पाटील गट अशी या ठिकाणी निवडणूक होत आहे. खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील आणि रोहित पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
दुसरीकडे,आटपाडी बाजार समितीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित पॅनल उभे केले आहेत. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अनिल बाबर समर्थक तानाजी पाटील हे या पॅनेलचे नेतृत्व करत आहेत. विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे.या सगळ्यात मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपले मते टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.