इंडिया वन कंपनीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव
बेळगाव : एटीएम फोडण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षक नसलेले एटीएम बंद करण्याच्या सूचना पोलीस दलाकडून दिल्या जात आहेत. यावरून इंडिया वन कंपनीचे दोन एटीएम बंद करण्यात आले असून कंपनीने यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यासंबंधी राज्य पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे तक्रार करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांनी यरगट्टी व निपाणी, खडकलाट येथील एटीएम बंद ठेवण्यास सांगितली आहेत. सिक्युरिटी गार्ड नसल्यामुळे बंद करण्याची सूचना केली आहे. आरबीआयने सूचित केल्याप्रमाणे सर्व सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह इतर सूचनांचे पालन करण्यात आले आहे. सुरक्षारक्षक नाही म्हणून एटीएम बंद पाडणे योग्य नाही. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयानेही सुरक्षाविषयक सूचना केल्या आहेत. आम्ही ग्रामीण भागात एटीएम सेवा देतो. सुरक्षारक्षक नियुक्त करणे अनिवार्य नसल्यामुळे आम्ही याची व्यवस्था केलेली नाही. ती अनिवार्य नाही, असे न्यायालयानेही सुचवले आहे, असे सांगत कंपनीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतही पाठविली आहे.









