बाजारपेठेला छोट्या जत्रेचे स्वरुप : पोलिसांकडून उपाययोजना मात्र नागरिकांना समस्या
बेळगाव : येणार येणार म्हणता म्हणता बुधवारी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. एकीकडे मंडळांची लगबग वाढली आहे, तर दुसरीकडे गणेशाच्या स्थापनेसाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अर्थातच बाजारपेठही पूर्णत: सज्ज झाली असून मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी सुरू आहे. शहरामध्ये साधारण 200 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. महिनाभर आधीपासूनच त्यांची तयारी सुरू झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मंडप उभारणाऱ्या कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर मंडपांवर विद्युत रोषणाई केली जात असल्याने विद्युतमाळांना आणि इलेक्ट्रिशियनना मागणी वाढली आहे.
गणेश पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याने बाजारपेठेला छोट्या जत्रेचे स्वरुप आले आहे. गणपत गल्लीमध्ये तर सोमवारी दुपारपासूनच साहित्य विक्रीसाठी आपली जागा निश्चित करणाऱ्या विक्रेत्यांची गर्दी झाली. पूजेसाठीचे आंब्याचे टाळ, केळीचे मोने, केळीची पाने, माटोळी, कमळ, केवडा, शेवंती, अॅस्टर, जर्बेरा, गुलाब आदी फुले, पाच फळांचा संच, विड्याची पाने, वाती, वस्त्र, अत्तर, जानवे, शेंदूर, धूप, कापूर, नागापुडा, दिव्यासाठीचे खास तेल, गणेशाच्या आसनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे चौरंग, विविध बस्कर, सजावटीसाठीचे पडदे, विद्युत माळा, झिरमिळ्या, कृत्रिम फुले, गणपती बाप्पा मोरया ही अक्षरे, मोत्यांचे वेगवेगळ्या स्वरुपातील हार, श्रीफळ, नारळ, कच्ची केळी यांची आवक वाढली असून खरेदीसुद्धा तेजीत झाली आहे.
अलीकडच्या काही दिवसांमध्ये घरांमध्येसुद्धा श्रीमूर्तींची आकर्षक सजावट केली जाते. यासाठी हौशी युवक, थर्मोकोलपासून कलाकृती तयार करण्यात मग्न आहेत. सजावटीसाठी मोरपिस, रंगीबेरंगी फुले, चकाकते बॉल, शिवाय कुंदनवर्कच्या कलाकृती उपलब्ध आहेत. अलीकडे गणेश चतुर्थीदिवशी घरातील श्रीमूर्तीची स्थापना करून सार्वजनिक मंडळाचा गणपती आणण्यासाठी गर्दी होत असल्याने काही मंडळांनी अगोदरच श्रीमूर्ती आणून स्थापन केली आहे. त्यांचा आगमन सोहळाही थाटात पार पडला. मंडळांनी गणहोम, सत्यनारायण, महाप्रसाद यांचेही नियोजन केले असून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींची पूजा करताना भटजीवर्गाची मात्र तारांबळ उडणार आहे. मंगळवारी हरितालिकेचे व्रत असून उपवासाचे साहित्यही बाजारपेठेत उपलब्ध आहे. सोमवारी हरितालिकांच्या मूर्तींची खरेदी झाली. गणेश चतुर्थीदिवशी बहुसंख्य घरांमध्ये खतखतं हा अनेक भाज्या घालून केला जाणारा पदार्थ तयार केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत नेहमीपेक्षा भाज्यांची आवक वाढली आहे. तसेच एरवी सहजी न मिळणाऱ्या भाज्यासुद्धा विक्रीस आल्या आहेत. एकूणच बाप्पांच्या आगमनाची आतुरता वाढली असून मंगलमय वातावरणाचा अनुभव येत आहे.
तयारी अहोरात्र
मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांचे वैविध्यपूर्ण नमुने पाहायला मिळत आहेत. खवा मोदक, मावा मोदक, केसरी मोदक,ड्रायफ्रूटचे मोदक असे एक ना अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. या शिवाय अन्य मिठाईंनासुद्धा मागणी आहे. प्रसादासाठी वितरित केल्या जाणाऱ्या गोड बुंदीचे बुकिंग झाले आहे. काही मंडळांनी ढोलताशा पथकांची मागणी नोंदवली आहे. अशा मंडळांच्या वादनाची तयारी अहोरात्र सुरू आहे.









