अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा! सत्व, रज, तम हे गुण निखालस अविद्यात्मक आहेत. तीन गुणांची साम्यावस्था हेच प्रकृतीचे खरे स्वरूप आहे. म्हणून सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचेच आहेत, आत्म्याचे नव्हेत. त्रिगुण हेच जगाची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय यांना कारण आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे कार्य त्रिगुणांचे आहे. त्या तीन गुणांची जी साम्यावस्था ती प्रकृती होय. आता तुला कदाचित वाटेल की, परमात्मा जरी गुणातीत असला, तरी जीवात्मा गुणांनी युक्त आहेच की? पण तेही खरे नाही. चंद्र हा मूळात निश्चल असतो. पण तो ढगांमधून झपाटय़ाने चालताना दिसतो. त्याप्रमाणे जीवात्मा गुणात विहार करतो आहे असे वाटते.
माठात जरी पाणी भरले तरी आतली पोकळी ओली होत नाही त्याप्रमाणे जीवात्माही गुणांमध्ये वागत असतांना गुणापेक्षा वेगळा असतो. यावर उद्धवाच्या मनात एक शंका आली म्हणून त्याने विचारले की, जीव हा ‘मी कर्ता’ असा अहंकार धरण्यामध्ये प्रसिद्ध आहे. तेव्हा सहाजिकच मी कर्म करतो असे त्याने समजणे सहाजिक आहे मग तो कर्माच्या पलीकडे आहे असे कसे म्हणता येईल? उद्धवाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंत म्हणाले, सत्व, रज, तम हे तिन्ही गुण प्रकृतीचे असल्याने ते प्रकृतीच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांचा प्रभाव दाखवतात. सत्त्वगुणापासून ज्ञान होते, रजोगुणापासून कर्म होते आणि तमामध्ये आळसयुक्त मोह व अज्ञान नांदत असते. काळ हा सुद्धा त्रिगुणयुक्त आहे. तसेच मायेमुळे जे पहिले कार्य निर्माण होते, त्याला ‘महत्तत्व’ असे नाव आहे व त्यालाच ‘प्रधान-सूत्र’ असेही म्हणतात. अर्थात हीही प्रकृतीची किमया असल्याने काळ म्हण, महतत्त्व म्हण हे प्रकृतीचाच भाग होत. प्रकृतीकडून ही सगळी किमया घडून येण्यासाठी शक्तीची गरज असते ती शक्ती तिला जिवात्म्याकडून मिळते. म्हणजेच जीवात्मा फक्त आवश्यक ती शक्ती पुरवण्याचे काम करतो. प्रकृतीकडून होणाऱया कार्यात त्याचा यतकिंचितही सहभाग नसतो पण त्रिगुणांच्या प्रभावाखाली घडत असलेल्या कार्यांना त्याच्याकडून शक्ती पुरवठा होत असल्याने, आपल्यामुळे ही कार्ये घडत आहेत असा अहंकार त्याला वाटत असतो. अर्थातच त्याचा हा अहंकार वृथा असतो कारण कार्यात सहभाग नसताना मी कर्ता आहे असे समजणे निरर्थक आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो. सूर्य फक्त प्रकाश देत असतो आणि त्या प्रकाशात लोक आपापली कामे करत असतात पण म्हणून सूर्य ती कामे करतो असं कुणी म्हणत नाहीत त्याप्रमाणेच आत्म्याच्या शक्तीने कार्ये घडत असली तरी ती आत्म्याने केली असं म्हणता येत नाही.
प्रकृतीहून आत्मा किंवा पुरुष भिन्न आहेत हे कृष्णाचे भाषण ऐकून उद्धवाला चमत्कार वाटला कारण, प्रकृती आणि पुरुष भिन्न आहेत हे भगवंतांचे बोलणे त्याच्या पचनी पडत नव्हते. म्हणून त्याने असा विचार केला की, प्रकृति आणि पुरुष ह्यांच्या भिन्नपणाबद्दल आपण देवालाच विचारावे. तो म्हणाला, हे कृष्णा! प्रकृती आणि पुरुष सर्वथैव वेगळे आहेत हे समजले, कारण, प्रकृती जड म्हणजे निर्जीव आहे तर पुरुष चैतन्यरूपी आहे पण ती एकमेकांपासून वेगळी कशी, हे समजत नाही. तसं बघायला गेलं तर ते एकमेकांमध्ये मिसळून गेल्यामुळे त्यांच्यामध्ये नजरेला तर काही फरक दिसत नाही. प्रकृतीमध्ये पुरूष आणि पुरूषामध्ये प्रकृती बेमालूमपणे मिसळली आहे, असेच वाटते. उदाहरणच द्यायचं झालं तर, ज्याप्रमाणे तापलेला लोखंडाचा गोळा हुबेहब अग्नीसारखाच दिसतो, त्याप्रमाणे प्रकृतीची आणि पुरुषाची सांगड ऐक्मयरूपाने अगदी दृढ बांधलेली दिसते.
दाण्याशिवाय जसा कोंडा वाढत नाही किंवा शिंपीच्या अंगी ज्याप्रमाणे रुप्याची कांति जडलेली असते, त्याप्रमाणे जगामध्ये पुरुषाच्या संगतीने प्रकृतीचाही भास होतो. पुरुषाशिवाय प्रकृतीही दृष्टिगोचर होत नाही. तेव्हा हे प्रकृती-पुरुषांचे कोडे तुझ्याशिवाय कोणी उलगडून सांगणार नाही कारण, भगवंता तुला हे दोघे वेगवेगळे दिसत असून तू या दोघांकडे साक्षी म्हणून पहात आहेस हे लक्षात येते.
क्रमशः








