म्हापसा पोलिसांची यशस्वी कामगिरी, दिल्लीतील टोळीतील चौघा चोरटय़ांना अटक
प्रतिनिधी/ म्हापसा
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱया वयोवृद्धांवर पाळत ठेवून मदतीच्या बहाण्याने त्यांच्याकडील एटीएम व पीन घेऊन लुबाडणाऱया टोळीला म्हापसा पोलिसांनी एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये रंगेहाथ पकडले. यामुळे पोलिसांनी जरी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी जनतेने एटीएममधून पैसे काढताना आतमध्ये कुणालाही घेऊ नये वा कुणावरही विश्वास ठेवून पैसे वठविण्यास सांगू नये, असे आवाहन उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी म्हापसा पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. कुणी वयोवृद्ध एटीएममध्ये गेल्यास त्यांनी बँक कर्मचाऱयाशी संपर्क साधून पैसे वठवावेत नाहक कुणालाही पैसे वठविण्यासाठी आपले एटीएम कार्ड व पीन देऊ नये, असे आवाहन अधीक्षकांनी केले आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिल कुमार (36), आनंद महाबीर (26), राजेश कुमार (35) तिघेही राहणारे सुलतानपुरी नवी दिल्ली, नवीन कुमार (30, रा. भिवानी हरियाणा) यांचा समावेश आहे. हे चौघेही दिल्ली येथील रहिवासी आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी दिली. त्यांच्याकडून एकूण विविध बँकांची 55 एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केली असून दोन पोज मशिनही ताब्यात घेतली आहे.
3 जूनला महिलेची तक्रार
शुक्रवार 3 जून रोजी म्हापसा एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये मिलींदी गावडे (रा. सत्तरी) ही वयोवृद्ध महिला गेली असता एक अज्ञात इसम आतमध्ये घुसला. त्याने मदत करतो असे सांगून तिच्याकडील एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड आपल्याकडे घेतले व तिची नजर चुकवीत एसबीआयचे बनावट दुसरे कार्ड तिच्या हातात दिले. पुन्हा कार्ड मशीनमध्ये घातले असता कार्ड चालत नसल्याचा संदेश आल्याने ती महिला तेथून गेल्यावर तिच्या मूळ कार्डचा वापर करून बँकेतून दीड लाख रुपये वठविले व त्वरित आपल्या गावी ट्रान्स्फर केले. याबाबत त्या महिलेला आपल्या बँकेमधून पैसे वठविल्याचे समजल्यावर तिने त्वरित म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.
खास पोलीस पथक नेमले
घटनेची माहिती पोलीस अधीक्षक सोबित सक्सेना यांना दिल्यावर उपअधीक्षक जिवबा दळवी व निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक नेमण्यात आले. त्यात उपनिरीक्षक बाबलो परब, उपनिरीक्षक विराज कोरगावकर, उपनिरीक्षक आशिष परब, हवालदार आल्वीटो डिमेलो, सुशांत चोपडेकर, शीपाई राजेश (कानो) कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, अनिल राठोड, लक्ष्मीकांत नाईक यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तासाच्या आत संशयित आरोपींना गजाआड करण्यास यश मिळविले. म्हापसा पोलिसांनी भा.दं संहितेच्या कलम 380, 34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
आठ एटीएमचा वापर केला त्याचा शोध सुरू आहे
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सोबित सक्सेना म्हणाले की, राज्यात एटीएममध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सीसीटीव्ही पॅमेरामध्ये चार – पाच जणांचा यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. सर्व घटनांमध्ये त्याच चार इसमांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले होते. यामुळे या चोरटय़ांना पकडण्यासाठी खास पोलीस पथक नेमण्यात आले व त्यांना या चोरटय़ांना पकडण्यास योग्य सहकार्य मिळाले. तक्रारदार महिलेची बँक खाती तात्पुरती बंद केली आहेत. चोरटय़ांनी आणखी आठ जणांच्या एटीएम कार्डचा वापर केला आहे, त्यांची ओळख पोलिसांनी घेतली असून चौकशी सुरु आहे.
24 तास पोलीस तैनात, बीट सिस्टम सक्रिय
या दिवसात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत हे जरी खरे असले तरी अशा घटनावर आळा घालण्यासाठी जनता स्वतःहून तक्रार देण्यास पुढे येत आहे आणि आम्ही त्याचा छडा लावतो हे आमच्यासाठी खूप आहे. जुने गोवे येथे सोनसाखळी हिसकावून पळालेल्या चोरटय़ाला पकडले आणि सोनसाखळीही हस्तगत केली. गुन्हे घडू नयेत याकडे आमचे लक्ष आहे. उत्तर गोव्यात आणि म्हापशात 24 तास पोलीस तैनात आहेत. बीट सिस्टम पुन्हा सक्रिय करण्यात आली आहे. सर्वत्र नाके, पेट्रोलिंग सुरू आहे. पर्यटकही गुन्हे करतात मात्र त्यांना पकडण्यात आम्ही यशस्वी झालो असल्याची माहिती अधीक्षक सक्सेना यांनी दिली. तक्रारदार इमेलद्वारे तक्रार करतात. आम्ही तक्रारदाराकडे जातो तक्रारदार आमच्याकडे येत नाही, असे ते म्हणाले.
पोलीस इराणी गँगच्या मार्गावर
पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून लुटल्याप्रकरणी म्हापशातून दोन तर पर्वरीहून एक तक्रार आली आहे. आम्ही त्या चोरटय़ांच्या मागावर आहोत. रेखाचित्रही जारी करण्यात आले असून हे इराणी गँग असल्याचा सुगावा लागला आहे. महाराष्ट्र येथील इराणी गँगचे चोरटे येऊन येथे महिलांना टार्गेट करून लुटून जातात, अशी माहिती हाती आली आहे त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत.
बॉक्स करणे
अशी करीत होते एटीएम कार्डची चोरी
संशयित आरोपी दिल्लीहून गोव्यात आले होते. वयोवृद्ध महिलांना ते टार्गेट करायचे. एखादी वयोवृद्ध महिला एटीएममध्ये आपले पैसे वठविण्यासाठी गेल्यावर ते एका मागोमाग एक असे आत जायचे. तिची विचारपूस करत आपण तुम्हाला पैसे वठवून देतो असे सांगून एटीएम कार्ड घ्यायचे वा ती दाबत असलेला पासवर्ड नंबर लक्षात ठेवून त्या महिलेची नजर चुकवून आपल्याकडील त्या बँकेचे बनावट एटीएम कार्ड दिले जायचे. ती महिला गेल्यावर त्वरित मूळ कार्डचा वापर करून पैसे आपल्या गावातील खात्यावर पाठवित होते. या चोरटय़ांनी दोन पोज मशीन बाळगली होती त्या आधारेही ते पैसे वटवून आपल्या खात्यात जमा करीत होते, अशी माहिती अधीक्षक आयपीएस सोबित सक्सेना यांनी दिली.
एटीएममध्ये संशयास्पद आढळल्यास 112 नंबर डायल करा
एटीएममध्ये जाताना कुणाला आतमध्ये घेऊ नका. काही कळत नसल्यास वॉचमॅनला किंवा बँक अधिकाऱयांचा सल्ला घ्या. तेथे वॉचमॅन नसल्यास बँकेला माहिती द्या. कोणी आतमध्ये आल्यास त्याला बाहेर उभे राहण्यास सांगा. तो बाहेर जात नसल्यास त्वरित 112 नंबर डायल करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोबित सक्सेना यांनी केले.