मध्यरात्री चौघा चोरट्यांचे कृत्य : आजऱ्यातही एटीएम फोडण्याचा प्रयत्न
बेळगाव : गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी सेफ बॉक्समधील 75,600 रुपये पळविल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. 26 रोजी पहाटे बेळगाव-बागलकोट रोडवरील सांबरा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशाप्रकारे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची दुसरी घटना पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथेही घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये साम्य असल्याचे दिसून आल्याने बेळगावचे पोलीस तपासासाठी आजऱ्याला रवाना झाले आहेत. याप्रकरणी मनोज मल्हारी उक्कळी, रा. कारवार रोड, हुबळी यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बेळगाव-बागलकोट रोडवरील सांबरा गावात एसबीआय बँकेचे एटीएम आहे. मात्र, त्या ठिकाणच्या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. बुधवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान काळ्या रंगाच्या क्रेटा कारमधून चौघे चोरटे एटीएमनजीक आले. तिघेजण कारमधून खाली उतरले तर एकजण कारमध्येच होता. तिघांनीही तोंडाला मास्क घालण्यासह अंगावर चादर पांघरुण घेतली होती. त्यापैकी एका चोरट्याने एटीएम बाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला.
त्यामुळे सर्व कॅमेरे निकामी झाले. तर दोघे चोरटे गॅसकटर घेऊन आत शिरले. मध्यरात्री 2.30 ते 3.30 च्या दरम्यान चोरट्यांनी एटीएमचा लोखंडी सेफ डोअर कट केला. त्यानंतर त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या 500 रुपयांच्या दीडशे नोटा आणि 100 रुपयांच्या 6 नोटा असे एकूण 75,600 रुपये पळविले. अवघ्या तासभरात चोरट्यांनी आपला डाव साधला. सांबरा येथील एसबीआय एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याबाबत हेड ऑफिसला अलर्ट गेला. त्यानंतर ही माहिती मारिहाळ पोलिसांना देण्यात आली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. गावातील मुख्य रस्त्यावर असलेले एटीएम फोडण्यात आल्याची माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. घटनास्थळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, बेळगाव ग्रामीण उपविभागाचे प्रभारी साहाय्यक पोलीस आयुक्त जे. रघु, मारिहाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी हिताची पेमेंट्स सर्व्हिस प्रा. लि. चॅनेलचे मॅनेजर मनोज उक्कळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.
मध्यरात्री घडलेल्या या घटनेचा तपास पोलिसांनी हाती घेतला असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे देखील पहाटे 4.40 च्या दरम्यान अशाच प्रकारे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची माहिती बेळगाव पोलिसांना समजली. त्यामुळे बेळगाव पोलिसांचे पथक तातडीने आजऱ्याला रवाना झाले आहे. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता बेळगाव आणि आजऱ्यात घडलेल्या दोन्ही घटनांमध्ये साम्य आढळून आले. त्यामुळे ते एकाच टोळीचे काम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज, तसेच महामार्गावरील टोलनाक्यावरील फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सांबऱ्यात एकूण सात एटीएम केंद्रे
सांबरा गावात एसबीआयची एकूण तीन एटीएम आहेत. तर इतर बँकांची चार एटीएम आहेत. महादेवनगर येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पैसे डिपॉझिट करण्यात आले नाहीत. त्यामुळे या एटीएमचा वापर कमी झाला आहे. उर्वरित एटीएममध्ये कायम रक्कम असते. मात्र, मुख्य रोडवरीलच एटीएम फोडण्यात आले आहे. आजरा येथे जे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. त्या एटीएममध्ये 3 लाख रुपये होते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन विशेष पथकांची स्थापना
सांबरा येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आजरा येथे देखील पहाटेच्या दरम्यान अशाच प्रकारची एटीएम फोडण्याची अयशस्वी घटना घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये साम्य असून आठवडाभरात या प्रकरणाचा तपास लावण्यात यश येईल.
– यडा मार्टिन मार्बन्यांग, पोलीस आयुक्त










