वृत्तसंस्था/ बार्सिलोना
स्पॅनिश लिग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात 10 खेळाडूनीशी खेळणाऱ्या अॅटलेटिको माद्रीदने सेव्हिलाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
सेव्हिला आणि अॅटलेटिको माद्रीद यांच्यातील हा सामना सुरूवातीला सप्टेंबरमध्ये घेण्याचे निश्चित केले होते. पण त्यानंतर खराब हवामानामुळे सदर लढत लांबणीवर टाकण्यात आली होती. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला अॅटलेटिको माद्रीद संघातील बदली खेळाडू मार्कोस लॉरेंटने एकमेव निर्णायक गोल केला. या सामन्यात सेव्हिलाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. सामन्यातील शेवटची 20 मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू कॅगलेर सोयुनेकूला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने अॅटलेटिकोला सामन्यातील उर्वरित कालावधीत 10 खेळाडूनीशी खेळावे लागले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात गिरोना संघ आघाडीवर असून या संघाने अॅटलेटिको माद्रीदपेक्षा सात अधिक गुण नोंदविले आहेत. या सामन्यात सेव्हिलाला उत्तरार्धात पेनल्टीची संधी मिळूनही त्यांना आपले खाते उघडता आले नाही.









