वृत्तसंस्था/दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येकी महिन्यात सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूची निवड त्यांच्या कामगिरीचा आढावा घेत केली जाते. जुलै महिन्यासाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिनसन याची पुरूष विभागात तर लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूची महिला विभागात सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.
विंडीज विरुद्ध अलिकडेच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अॅटकिनसनने दर्जेदार कामगिरी केली. जुलै महिन्यातील या आयसीसीच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरूषांच्या विभागातील पुरस्कार शर्यतीमध्ये अॅटकिनसन, भारताचा अष्टपैलु वॉशिंग्टन सुंदर आणि स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज चार्ली कॅसेल यांच्यात चुरस होती. पण अॅटकिनसनने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. विंडीज विरुद्धच्या मालिकेत कसोटी पदार्पण करताना अॅटकिनसनने 12 गडी एका सामन्यात बाद केले. या मालिकेत अॅटकिनसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत त्याने आणखी 10 गडी बाद केले. या संपूर्ण मालिकेत त्याने एकूण 22 बळी घेत मालिकावीराचा बहुमान मिळविला.
लंकन महिला क्रिकेट संघाची कर्णधार चमारी अट्टापटूने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. अट्टापटूच्या नेतृत्वाखाली लंकेने या मालिकेतील अंतिम सामन्यात बलाढ्या भारताचा पराभव केला. भारतीय महिला संघाने यापूर्वी ही स्पर्धा 7 वेळा जिंकली होती. पण लंकेने यावेळी पहिल्यांदाज आशिया चषकावर आपले नाव कारले. या मालिकेत अट्टापटूने अष्टपैलु कामगिरी केली. तिने या मालिकेत फलंदाजीत 304 धावा जमविल्या. तसेच गोलंदाजीत तीने भारता विरुद्धच्या अंतिम सामन्यात 3 गडी बाद केले. जुलै महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये अट्टापटू, स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्यात चुरस होती.









