दिल्लीतील जलसंकट कायम : हरियाणा सरकारवर केले आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणाकडून दररोज 100 दशलक्ष गॅलन पाणी सोडण्यात यावे या मागणीवरून दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी आतिशी यांनी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता, आप खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज उपस्थित होते.
आतिशी दक्षिण दिल्लीच्या भोगल येथे उपोषण करत आहेत. सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही हरियाणा सरकार दिल्लीच्या वाट्याचे पूर्ण पाणी सोडत नसल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे. आम्ही या भीषण उकाड्यात पशूपक्षींसाठी छतांवर पाणी ठेवतो, परंतु भाजपचे नेते दिल्लीच्या लोकांना थेंबभर पाण्यासाठी तडफडवत असल्याची टीका संजय सिंह यांनी केली आहे.
दशकांपूर्वी महात्मा गांधी यांनी स्वदेशासाठी, सर्वसामान्यांच्या अधिकारासाठी सत्याग्रहाचा मार्ग पत्करला होता, आता त्यांनीच दाखवून दिलेल्या मार्गाचे अनुसरण करत दिल्लीच्या लोकांसाठी मी उपोषण करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आहे.
दिल्लीच्या मंत्री आतिशी या बेमुदत उपोषण करत आहेत. या काळात त्या काहीच खाणार नाहीत, केवळ पाणी पितील. दिल्लीच्या तहानलेल्या लोकांसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना होणारा त्रास टीव्हीवर पाहून मोठे दु:ख होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. आतिशी यांची तपस्या यशस्वी होईल आणि लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा असल्याचे उद्गार सुनीता केजरीवाल यांनी काढले आहेत.
तहानलेल्याला पाणी देणे आमच्या संस्कृतीचा भाग आहे. दिल्लीला शेजारी राज्यांकडून पाणी मिळते. या उष्णतेच्या लाटेदरम्यान शेजारी राज्यांकडून मदत होईल अशी अपेक्षा होती, परंतु हरियाणाने मदत नाकारली आहे. दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आहे, परंतु ही वेळ राजकारण करण्याची नाही असे वक्तव्य सुनीता केजरीवाल यांनी केले आहे.