वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता आपण पत्रकार परिषद घेऊन ईडीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे सांगितले. आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात सुरू असलेल्या तपास यंत्रणांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आतिशी काय बोलतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी त्यांनी ‘आप’च्या आमदारांना भाजपमध्ये ओढण्यासाठी कोट्यावधी रुपयांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या आरोपांमुळे खवळलेल्या भाजपने त्यांच्याकडे पुराव्यांची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण गुन्हे शाखेपर्यंत पोहोचले असून पोलिसांनी आतिशी यांना नोटीस बजावून तीन दिवसात उत्तर मागितले आहे.









