गेल्या 6 वर्षातील 183 चकमकींच्या चौकशीचीही मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ याच्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 28 एप्रिल रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. 15 एप्रिलच्या रात्री पत्रकार बनून आलेल्या तिघांनी अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या केली होती. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे घडलेल्या या घटनेत तीनही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडलेले असून त्यांना सध्या कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.
अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत 2017 पासून उत्तर प्रदेशात झालेल्या 183 चकमकींच्या चौकशीचीही मागणी करण्यात आली आहे. तिवारी यांनी सोमवारी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याचा उल्लेख केला. मात्र, पाच न्यायाधीश कोरोनाबाधित झाल्यामुळे ते न्यायालयीन प्रक्रियेसाठी उपलब्ध नसल्याने बऱ्याच सुनावण्या लांबणीवर पडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये तारखा देण्यात आल्या असून अतिक अहमद हत्या खटल्यासाठी शुक्रवार, 28 एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे.









