वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तर प्रदेशातील गँगस्टर अतिक अहमद याची 45 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता उत्तर प्रदेश सरकारच्या आधीन करण्यात आली आहे. न्यायालयाने तसा आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. प्रयागराज पोलिसांकडून या मालमत्ता गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जप्त करण्यात आल्या होत्या. ही कारवाई उत्तर प्रदेशातील गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली होती.
या मालमत्ता अतिक अहमद याने दमदाटी करुन अत्यंत अल्प किमतीला या परिसरातील लोकांकडून मिळविल्या होत्या, असे तपासात आढळले होते. या मालमत्ता अहमद याने नंतर एका गवंड्याच्या नावे नोंद केल्या होत्या. या गवंड्याने पोलिसांना ही माहिती देत या मालमत्तांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यायालयातही त्याने ही माहिती दिली होती. अतिक अहमद याने या मालमत्ता काही लाख रुपयांमध्ये घेतल्या होत्या, तेव्हा त्यांची बाजारातील किंमत 5 कोटी रुपये होती. आज या मालमत्तांची किंमत 45 कोटी रुपये इतकी आहे, असे महसूल अधिकाऱ्यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते. न्यायालयाने या मालमत्ता उत्तर प्रदेश सरकारने घ्याव्यात असा आदेश दिला होता.









