गुजरातच्या साबरमती तुरुंगातून रवाना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
उमेश पाल हत्याप्रकरणी माफिया अतीक अहमद विरोधात कायदेशी कारवाईचा फास दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अतीकला आता गुजरातच्या साबरमती तुरुंगातून प्रयागराज येथे आणले जात आहे. पोलीस अतीकला सोबत घेत उत्तरप्रदेशसाठी रवाना झाले आहेत. अतीकला उत्तरप्रदेशात परत आणण्यासाठी एक सहाय्यक पोलीस आयुक्तासह 2 पोलीस निरीक्षक अन् 30 कॉन्स्टेबलांचे पथक पाठविण्यात आले होते.
अतीकला यावेळी देखील रस्तेमार्गाने उत्तरप्रदेशात आणले जात आहे. अतीक आणि त्याचा पुत्र अली समवेत 13 जणांच्या विरोधात आणखी एक एफआयआर नोंदविण्यात आला आहे. प्रयागराज येथील धूमनगंज पोलीस स्थानकात हा गुन्हा नोंद झाला आहे. 1 कोटी रुपयांची खंडणी अन् जीवघेणा हल्ला तसेच हत्येच्या आरोपीप्रकरणी आता कारवाई करण्यात येत आहे. अतीकला नवा गुन्हा नोंद झाल्याने साबरमती तुरुंगातून पुन्हा प्रयागराज येथे आणले जात आहे. उमेश पाल हत्याप्रकरणी प्रयागराज पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयाकडून बी वॉरंट प्राप्त केले आहे. एका जुन्या खटल्याप्रकरणी अतीक अहमदची तुरुंगात चौकशी करत जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी यापूर्वीच न्यायालयाकडून मंजुरी मिळविली आहे.









