बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित राजू दोड्डण्णवर चषक लिटल चॅम्प 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अॅथलेटोन संघाने लेकव्ह्यु संघाचा 7 गड्यांनी तर सीईपॉवर रंगरेज संघाने एमसीसी ब्लास्टर संघाचा 12 धावांनी पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. सलमान धारवाडकर, अथर्व होनगल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सामन्यात लेकव्ह्यु टायटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 115 धावा केल्या. त्यात श्रेयस पाटीलने 8 चौकारासह नाबाद 56, चैतन्य अनगोळकरने 6 चौकारासह 32 धावा केल्या. अॅथलेटोन संघातर्फे श्लोक चडीचालने 4 गडी तर अथर्व होनगलने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अॅथलेट संघाने 18.3 षटकात 3 गडी बाद 116 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात अथर्व होनगलने 8 चौकारासह नाबाद 50 तर श्रीजित चोपडेने 3 चौकारासह 25 धावा केल्या. लेकव्ह्युतर्फे श्रेयस पाटील, अर्णव राजमाने, अरव चडीचाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात सीईपॉवर रंगरेज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 136 धावा केल्या. शिवनेश यळ्ळूरकरने 5 चौकारासह 42, कुशल बेळगावकरने 3 चौकारासह नाबाद 25 धावा केल्या. एमसीसीतर्फे आदित्य बिडकरने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी संघाने 20 षटकात 5 गडी बाद 124 धावा केल्या. अराध्य तुडयेकरने 9 चौकारासह नाबाद 80 धावा केल्या. रंगरेजतर्फे पार्थ, आयुष, शिवनाथ व सलमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.









