वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
त्रिनिदाद व टोबॅगो येथे होणाऱ्या 2023 राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या आठ सदस्यीय अॅथलेटिक्स संघाची निवड करण्यात आली असल्याचे अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने सांगितले.
या स्पर्धेची ही सातवी आवृत्ती असून 4 ते 11 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. ‘भारताचा आठ सदस्यीय अॅथलेटिक्स संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून 4 तारखेपासून त्याची सुरुवात होत आहे,’ असे एएफआयने ट्विट केले आहे. भारताच्या या अॅथलेटिक्स संघात अभय सिंग (200 मी.), नवप्रीत सिंग (400 मी.), अर्जुन (भालाफेक), बापी हंसदा (400 मी. हर्डल्स), आशा किरण बार्ला (800 मी.), शिरीन अहलुवालिया (रिले), अनुप्रिया सासी (गोळाफेक) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाचा सर्व खर्च क्रीडा मंत्रालय करणार नसून भारतीय ऑलिम्पिक संघटना पेलणार असल्याचे समजते. ही स्पर्धा 1 ते 7 ऑगस्ट 2021 या वर्षी आयोजित करण्यात आली होती. पण कोरोना महामारीमुळे आणि 2020 टोकियो ऑलिम्पिक आणि 2022 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामुळे ही अॅथलेटिक्स स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती.









