वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकामध्ये समावेश असलेल्या सेनादलातील खेळाडूंचा येथे लष्कर प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भारतीय सेना दलाचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केलेल्या सेना दलातील खेळाडूंचा गौरव केला. या स्पर्धेसाठी पाठविण्यात आलेल्या 117 खेळाडूंच्या भारतीय पथकामध्ये सेनादलातील 13 खेळाडू सहभागी झाले होते. भारताचा भालाफेक धारक तसेच सुभेदार मेजर निरज चोप्राने रौप्य पदक पटकाविले. त्याच्या या कामगिरीचे सेनादलाला तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमान पदासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळेल, अशी आशा लष्कर प्रमुखांनी व्यक्त केली. 2004 च्या अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत सेना दलातील अधिकारी तसेच नेमबाज कर्णल आर. व्ही. एस. राठोड यांनी रौप्य पदक नेमबाजीत पटकाविले होते. तर 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सेनादलातील सुभेदार मेजर विजयकुमार यांनी नेमबाजीत रौप्य पदक मिळविले होते. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक मिळविले होते. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सेना दलातर्फे पहिली महिला खेळाडू जस्मिन हिने मुष्टियुध्द स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सेना दलातील क्रीडापटूंनी 20 पदकांची कमाई केली होती.









