जीएसआयडीसीचे अधिकारी संदीप चोडणेकर यांची माहिती : अत्त्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असफल,मद्रास आयआयटी तज्ञांकडून तपासणी
प्रतिनिधी /पणजी
येथील मांडवी नदीवरील ‘अटल सेतू’ पुलावरील डांबर उखडून ज्या ठिकाणी खड्डे निर्माण झालेले होते त्या सर्वांची डागडुजी पूर्ण करण्यात आली आहे. तथापि, सध्या बसविलेला डांबराचा थर ठेवायचा की नाही? याबाबतचा निर्णय तज्ञांच्या अहवालानंतरच घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता झुवारी पुलावरदेखील अशाच पद्धतीचा डांबराचा थर बसविणे योग्य होणार की नाही? याबाबतचा निर्णयही लवकरच घेतला जाणार आहे.
गोवा राज्या पायाभूत विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अधिकारी तथा अटल सेतू पूल ज्यांच्या देखरेखीखाली निर्माण झाला ते संदीप चोडणेकर यांनी वरील माहिती दिली. अटल सेतू पुलावर वेगळ्य़ा पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले होते. विदेशातही अशा पद्धतीची योजना असते. तशाच पद्धतीने गोव्यात प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर अटल सेतूवर करण्यात आला आहे.
‘अटल सेतू’वरील रस्त्याच्या डांबरीकरणाची रचना
अटल सेतूवर मुख्य पुलाचे जे काँक्रिटचे स्लॅब आहेत त्यावर रस्त्यासाठी थेट डांबरीकरण न करता बिट्मीनचा वापर करण्यात आला आहे. रबर तथा प्लास्टिक यांचे हे मिश्रण असून त्याचा एक थर आणि त्यानंतर त्यावर अन्य 5 थर मिळून डांबरीकरण केले आहे. उद्देश एवढाच होता की पुलाच्या स्लॅबला पाणी लागू नये. पुलावर पडणारे पाणी आत झिरपू नये. जेणेकरुन पावसाळ्य़ात या पुलामध्ये पाणी जाऊन गंज चढू नये. अत्याधुनिक असे हे तंत्रज्ञान आहे.
अत्त्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट असफल
मात्र अत्याधुनिक असे हे तंत्रज्ञान असूनही यातून उद्दिष्ट सफल झाले नाही. पाणी आत झिरपले आणि जे विविध प्रकारचे डांबरीकरणाचे थर बसविले होते ते उखडले गेले आणि पुलावर खड्डे निर्माण झाले.
आयआयटी मद्रासच्या तज्ञांकडून तपासणी
हे खड्डे अलिकडे बुजविण्यात आले. तथापि, हे तंत्रज्ञान बहुदा उपयोगी पडणारे नसावे. गोवा सरकारने आयआयटी मद्रासला या अनुषंगाने अभ्यास करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आयआयटीवाल्यांची 48 तज्ञांची एक तुकडी गोव्यात येऊन त्यांनी सुमारे 18 ठिकाणी खोदून त्यांचे नमुने पृथःकरणासाठी मद्रासला नेले आणि त्यावर त्यांचे संशोधन सध्या सुरु आहे. पुढील 15 दिवसांत त्यांचा अहवाल येईल, असे चोडणेकर म्हणाले.
मद्रास आयआयटीचा अहवाल महत्वाचा
मद्रास आयआयटीचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारण गोवा सरकार सध्या उभारीत असलेल्या झुवारी पुलावर देखील हेच तंत्रज्ञान वापरणार आहे. याचा वापर करावा की नको हे मद्रास आयआयटी तंज्ञांच्या अहवालावर अवलंबून आहे, असेही चोडणेकर यांनी स्पष्ट केले.









