पाणीपातळीत दिवसेंदिवस झपाट्याने घट
बेळगाव : पाऊस लांबणीवर पडल्याने जलाशये आणि नद्यांच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे पाणीसमस्या दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोपच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. शहराला केवळ आठवडाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राकसकोप तळाला अन् चिंता शहराला असे चित्र पहायवास मिळत आहे. जलाशयाची पाणीपातळी 2449.65 फूट इतकी आहे. मात्र, यातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. शिवाय पावसानेदेखील दडी मारली आहे. त्यामुळे मृतसाठ्यातील पाण्याचा वापर करण्याची वेळ पाणीपुरवठा कंपनीवर आली आहे. यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही. शिवाय मान्सूनदेखील लांबणीवर पडला आहे. त्यामुळे जलाशय आणि नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होऊ लागली आहे. विशेषत: हिडकल आणि राकसकोप जलाशयांच्या पाणीपातळीत घट झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. परिणामी शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तर मनपामार्फत 30 टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. तर दुसरीकडे मात्र काही शहरवासियांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. राकसकोप जलाशयाची एकूण पाणीपातळी 2475 फूट इतकी आहे. यापैकी सध्या जलाशयात 2449.65 फूट पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे. त्यामुळे आता डेडसाठ्यातील पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा कंपनीला डेडसाठ्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही.
पाणीसमस्या गंभीर
दरवर्षी वळीव पाऊस अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे मे महिन्यात जलाशयांची पाणीपातळी स्थिर राहण्यास मदत होते. शिवाय विहिरी आणि तलावांच्या पाणीपातळीतदेखील वाढ होते. मात्र, यंदा वळीव आणि नियमित पावसानेदेखील ओढ दिल्याने जलाशय, नदी आणि विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीसमस्या गंभीर बनू लागली आहे. येत्या दिवसात समाधानकारक मान्सून न झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती बिकट बनणार आहे. शिवाय पाणीपुरवठा कंपनीची डोकेदुखी वाढणार आहे.









