पुणे / प्रतिनिधी :
विदर्भात येत्या 1 ऑगस्टला, तर कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत 2 ऑगस्टला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला.
गेले काही दिवस पावसाने राज्यभर धुडगूस घातला आहे. यामुळे राज्यातील धरणे, नाले,नदी, ओढे तुडुंब भरली असून, जनजीवन मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाले आहे. काही भागांत अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. जुलै महिना पावसाच्या दृष्टीन पाणीदार ठरला असून, राज्य तसेच देशांतही सरासरीच्या अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, ओरिसाजवळ असणाऱ्या न्यून दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. यामुळे शनिवारपासून राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यभर तुरळक पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार, 1 ऑगस्टला मंगळवारी विदर्भातील काही जिल्हय़ात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर बुधवारी पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी या जिल्हय़ांत बुधवारी 2 ऑगस्टला ‘ऑरेंज अलर्ट’ अर्थात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.








