बांधकाम साहित्य गटारीत पडून पाण्याची कोंडी, नगरसेविकेकडून दखल
बेळगाव : संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथे गटारींमध्ये कचरा साचल्याने गटारीचे पाणी ओव्हर फ्लो होऊन घरांमध्ये शिरत होते. काही नागरिकांनी बांधकामासाठी लागणारे खडी, वाळू हे साहित्य गटारीवरच टाकल्याने गटारी तुंबून घरांमध्ये पाणी शिरत होते. नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या प्रयत्नांमुळे गटारी स्वच्छ करून पाण्याला मार्ग करून देण्यात आला. अशीच परिस्थिती कंग्राळ गल्ली येथेही होत असून गटारी स्वच्छ करण्याची मागणी केली जात आहे. बेळगाव शहर व परिसरात मागील आठवडाभरापासून धुवाधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने गटारीही तुडुंब भरून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. तसेच काही नागरिकांच्या घरातही शिरत आहे. संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथे घराच्या बांधकामासाठी गटारीवर साहित्य टाकले होते. यातील खडी, वाळू गटारीमध्ये वाहून गेल्याने सांडपाणी अडले. हे सांडपाणी सखल भागात असणाऱ्या घरांमध्ये शिरत असल्याने स्थानिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार नोंदविली होती. परंतु, मनपाच्या कर्मचाऱ्यांनी या समस्येकडे डोळेझाक केली. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांना कामावर लावून गटारीमध्ये पडलेली खडी व वाळू काढून बाजूला टाकली. पाण्याला जाण्यास मार्ग मोकळा झाल्याने घरांमध्ये शिरत असलेले पाणी गटारीतून निघून गेले. नागरिकांनीही बांधकामाचे साहित्य टाकताना ते गटारीमध्ये पडणार नाही आणि पडल्यास त्याची वेळेत स्वच्छता करावी, असे आवाहन नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी केले.
कंग्राळ गल्लीतही समस्या
कंग्राळ गल्ली येथेही घरांची बांधकामे सुरू असून यासाठी लागणारे साहित्य गटारीवरच टाकण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे वाळू व खडी वाहत जाऊन गटारीमध्ये साचत आहे. महानगरपालिकेने गल्लीतील एकाच बाजूच्या गटारीची स्वच्छता केली. दुसऱ्या बाजूच्या गटारीची स्वच्छताच होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पावसाचे प्रमाण असेच वाढल्यास गटारीतील सांडपाणी घरामध्ये शिरण्यास वेळ लागणार नाही. यामुळे महानगरपालिकेने दुसऱ्या बाजूच्याही गटारींची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.









