मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळाव्यातून दावा
प्रतिनिधी/ मुंबई
लोकसभेच्या निवडणुकीत आमचा ठाकरे गटाशी 13 ठिकाणी लढा झाला. त्यात आम्ही सात जागा जिंकल्या. या निवडणुकीत त्यांना 42 टक्के तर आम्हाला 47 टक्के यश मिळाले. यातून खरी शिवसेना कुठे आहे हे मतदारांनी दाखवून दिले. लोकसभेहून विधानसभेचा विजय भव्यदिव्य राहिल. कारण सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण असून राज्यातील जनता महायुतीला निवडून देणार असल्याची खात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून दिली आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, यश सांगायला लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी सर्वच समाज घटक सरकारचे सदिच्छादूत म्हणून आहेतच. ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, सहा महिन्यात आमचे सरकार पडणार असे ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. तसेंच माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असें ही शिंदे म्हणाले.
धारावी प्रकल्पवर बोलताना शिंदे यांनी विश्वास व्यक्त करत धारावीचा विकास होईल असेच पाहत असल्याचे सांगत धारावी प्रकल्पात मात्र काड्या घालण्याचे काम सुरू असल्याचे सांगतले. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धाराविकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच दिल्लीला प्रकल्प आणण्यासाठी जात असल्याचे सांगत ‘मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही’ असा टोला देखील यावेळी लागवला.
तर पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने आशाताईनी सरकारचे कौतुक केल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडके सरकार झाले आहे. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती, त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेवर होणाऱ्या अन्याया विरोधात लढण्यासाठी उठाव केला असल्याचा पुनर्रउच्चर शिंदे यांनी केला. तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांबरोबर बाळासाहेब कधीही राहिले नसते. बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.
बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे आझाद मैदानात होणारा हा खऱ्या शिवसेनेचा आझाद मेळावा असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला. देशात आपले राज्य तिसऱ्या क्रमांकावर होते. पण आमच्या सरकारने सहा महिन्यांच्या आत राज्य पहिल्या क्रमांकावर आणले. थेट विदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पीक विमा योजना देणारे, जनतेला पाच लाख रुपयांचा विमा देणारे, शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेमध्ये वर्षाला 12 हजार रुपये देणारे, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे असे विविध क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे शिंदे म्हणाले.









