येत्या महिन्याभरात 15 ते 16 हजार कामगारांना काम देण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड : कामाला चालना दिल्याने समाधान
बेळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या तालुक्यात अनेकांना आधार ठरणाऱ्या उद्योग खात्री योजनेतील कामगारांना दिलासा देण्यात आला आहे. सध्या सुगी हंगाम सुरू आहे. त्यामुळे कामे देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र तातडीने याकडे लक्ष देण्यात येणार आहे. सध्या तालुक्यात 4 हजार कामगारांना काम देण्यात येत आहे. तर येत्या महिन्याभरात ही संख्या वाढविण्यात येणार आहे. उद्योग खात्रीमध्ये जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षाही अधिक कामे केली आहेत. मात्र आता मागील दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच धडपड सुरू झाली आहे. तालुक्यातही बऱ्यापैकी कामगारांना कामे देण्यावर भर दिला जात आहे. सध्या तालुक्यात 4 हजार कामगारांना काम देण्यात येत असून लवकरच ही संख्या 15 ते 16 हजारांवर नेण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. मागील चार वर्षांपूर्वी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये ग्राम पंचायतींनी उत्स्फूर्तपणे विविध कामे करून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या उद्योग खात्री योजनेचा लाभ घेत आहेत. आता मात्र रोजगारांना कामे कोणती द्यावी या विवंचनेतच अनेक तालुका पंचायत अधिकारी गुंतल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामगार संख्याही वाढविण्याकडे भर दिला आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात तालुक्यात 15 ते 16 हजार कामगारांना काम देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
गावपातळीवर विकास व्हावा यासाठीच योजना राबविणार
केंद्र सरकारने महात्मा राष्ट्रीय ग्रामीण उद्योग सुरू केला आहे. तो प्रभावीपणे राबविला जात आहे. त्यामुळे देशभरातच याची चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान 2023-24 या वर्षांकरिता उद्योग खात्री योजनेंतर्गत तालुक्यात कामांना चालना देण्यात आली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुक्यातील कामगारांना मोठ्या प्रमाणात काम देवून आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्रीतर्फे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळावा व गावपातळीवर विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना देशभरात राबविण्यात येत आहे.
कामगार वर्गातून समाधान
उद्योग खात्री योजनेतून विविध तलाव, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारी यासह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. काही गावातील रोजगार तर बाहेरच्या ग्राम पंचायत हद्दीत कामे करण्यास तयार झाले आहेत. मात्र त्या ठिकाणीही हीच परिस्थिती असल्यामुळे रोजगार हमी योजनेतून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध कसा करून द्यावा? हाच प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान आता तालुक्यातील कामांना चालना देण्यात आल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाधिक काम देण्याचे उद्दिष्ट
बेळगाव तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी, चारा टंचाईचे संकट उद्भवणार आहे. परिणामी रोजगारांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले असून कामे पूर्ण करण्यासाठी व अधिकाधिक कामे देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.









