वार्ताहर /हिंडलगा
मण्णूर येथील जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ संचालित जनकल्याण सामाजिक, शैक्षणिक फौंडेशनतर्फे मण्णूर, गोजगा व आंबेवाडी या तीन गावांतील मुलांसाठी आयोजित विविध स्पर्धा कलमेश्वर हायस्कूल येथे उत्साहात पार पडल्या. अध्यक्षस्थानी जनकल्याण फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री होते.
प्रारंभी सरस्वती फोटोपूजन मुख्याध्यापक वाय. के. नाईक व अध्यक्ष एल. के. कालकुंद्री यांच्या हस्ते झाले. चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले. दीपप्रज्वलन निवृत्त मुख्याध्यापक ओमाण्णा डोणकरी व निवृत्त शिक्षक कृष्णा चौगुले, संचालक व सल्लागार यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक व स्पर्धेची रुपरेषा संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी सांगितली. फौंडेशन व संस्थेच्या कार्याचा आढावा संस्थापक एल. के. कालकुंद्री यांनी मांडला.
निवृत्त मुख्याध्यापक डोणकरी व निवृत्त शिक्षक चौगुले यांनी मुलांना मार्गदर्शन केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यात करण्याचे ठरविण्यात आले. या फौंडेशनमार्फत गेल्या पाच वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये मुलांसाठी विविध स्पर्धा, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, कोरोना काळात गावातील लोकांसाठी आर्सेनिक अल्बम गोळय़ांचे वाटप, तसेच गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचण्णावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे आदी उपस्थित होते.









