कराड :
केवळ ‘युनिक’ उड्डाणपूल या गोंडस नावाखाली गेल्या अडीच वर्षांपासून कराडकरांच्या वाहतुकीची फरफट, उड्डाणपुलाच्या कामावरील कामगारांच्या पगाराचे खोळंबे यासह अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या कामातील महत्त्वपूर्ण काम सध्या आगाशिवनगरच्या ढेबेवाडी फाट्यावर (शिवछावा चौक) येथे अखेर बुधवारी सुरू झाले. या परिसरात तयार झालेल्या उड्डाणपुलावरील लाँचर उतरवण्याचे आव्हानात्मक काम ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरू केल्याने वाहतूक कोंडीसह किरकोळ अपघातांची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी नियमांचे व परिस्थितीचे भान ठेवत काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
नव्या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के पूर्ण होत आले. काम सुरू करताना जो जोश आणि वेग होता, तो सहा महिन्यानंतर कोलमडून पडला. साहजिकच कामाची डेडलाईन वाढली. ही डेडलाईन वाढल्याने वाहनधारकांचे बेहाल झाले. ते अजूनही सुरूच आहेत. यातच आता ढेबेवाडी फाट्यावर पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाच्या कामावरील अजस्त्र लाँचर उतरवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बुधवारी ठेकेदार कंपनीने वाहतुकीत मोठा बदल केला आहे. त्यांच्या सोयीनुसार पण पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत नियोजन करताना अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानुसार ढेबेवाडी फाट्यावरील वळणमार्ग बंद करून तो कृष्णा रुग्णालयापासून ढेबेवाडीकडे वळवला आहे. ढेबेवाडीकडून कराड शहरात, मलकापुरात जाणाऱ्या वाहनांसाठी ढेबेवाडी फाट्यावरील अंदाजे ७० फुटांच्या रस्त्याचे सिमेंटचे ब्लॉक टाकून तीन भाग केले आहेत. लाँचर याच परिसरातील फुडपार्कसमोर उतरवला जात असल्याने पश्चिम बाजूकडील सेवारस्ता बंद राहण्याची शक्यता आहे. या बदलामुळे आगाशिवनगर ते ढेबेवाडी खोऱ्यातील गावांकडून येणाऱ्या वाहनधारकांना जर मलकापुरात किंवा कोल्हापूर बाजूकडे जायचे असेल तर अंदाजे एक किलोमीटरचा वळसा घालून स्लीपरोडला यावे लागत आहे. लाँचर उतरवण्याचे काम आम्ही चार ते पाच दिवसात संपवू, असा दावा ठेकेदार कंपनीकडून केला जात असला तरी आत्तापर्यंतचा अनुभव पाहता तो कितपत खरा ठरेल, अशी चर्चा नागरिकांच्यात आहे. बुधवारी ढेबेवाडी फाट्यावर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होऊन रस्त्यांमध्ये बदल केला आहे. हा बदल पाहता वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता दाट आहे.
- अन्यथा काम बंद करू
लाँचर उतरवण्याचे काम दहा दिवसात संपेल का? तुमच्याकडे तेवढी यंत्रणा व मनुष्यबळ आहे का? वाहतूक कोंडी व अपघात होऊ नयेत म्हणून तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण होईल का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतली. यानंतर त्यांनी हे काम लवकर संपवण्याच्या सूचना दिल्या. सपोनि अमित बाबर, संदीप सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जर वाहनधारकांना त्रास झाला किंवा काम गणेशोत्सवापर्यंत लांबले तर ते त्याचवेळी थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असा इशाराही उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिला.








