अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे : रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा
वार्ताहर /कणकुंबी
चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कणकुंबी भागातील नागरिकांना रास्तारोको आंदोलन करणे भाग पडले. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नागरिकांनी सोमवार दि. 4 रोजी कणकुंबी येथे रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाला जागे केले. साडेतीन तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर तालुका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर म्हणजे सोमवारी 11.30 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी सकाळी 8 वाजता कणकुंबी येथे रास्तारोको आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी पारवाड ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष संजय पाटील, अध्यक्ष भिकाजी गावडे, कणकुंबी ग्रा. पं. माजी अध्यक्ष रमेश खोरवी, अध्यक्षा दीप्ती गवस, उपाध्यक्षा निलीमा महाले, कृष्णा गावडे, अरुण नाईक, मंगेश नाईक व इतर स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत होते. सर्व नागरिकांनी कणकुंबी बसस्टँडवर रस्त्यावर ठाण मांडले.
जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते, कंत्राटदार व इतर सर्व संबंधित अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आपण रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा घेतला होता. सकाळी अकरा वाजता खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता हे सर्व आल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. यावेळी कणकुंबी भागातर्फे माजी आमदार अरविंद पाटील, संजय पाटील, भिकाजी गावडे, कृष्णा गावडे व इतर कार्यकर्त्यांनी चोर्ला रस्त्याच्या संदर्भात समस्या मांडल्या व अनेक प्रश्न उपस्थित केले. बेळगाव-चोर्ला-गोवा हा रस्ता गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 9 लाख ऊपये मंजूर असून रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता किरण यांनी दिली.
तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे आश्वासन
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या अभियंत्यांना रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात ठोस आश्वासन देण्यास सांगितले. त्यानुसार उद्यापासून गुरुवारपर्यंत तीन दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अभियंता किरण यांनी दिले. यावेळी जर तीन दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर शुक्रवारी पुन्हा कणकुंबी येथे रास्तारोको आंदोलन हाती घेतले जाईल, असा सज्जड इशारा नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आजपासून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुऊवात करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी कंत्राटदार व अभियंत्यांतर्फे आंदोलनकर्त्यांना दिली. रस्त्याचे दुपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 263 कोटी ऊपये मंजूर केले आहेत. परंतु सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजवून स्थानिक नागरिक, प्रवाशांसाठी हा रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, असेही बजावण्यात आले. आंदोलनस्थळी बेळगाव आणि गोव्याच्या दिशेने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अवजड वाहतूक अनमोड मार्गे वळविणार
यावेळी खानापूर तहसीलदार व पोलिसांनी चोर्ला मार्गावरून होणारी अवजड वाहतूक बंद करून अनमोड मार्गे वळवण्यात येईल, अशी माहिती दिली. सध्या रस्त्याची दुर्दशा व्हायला अवजड वाहतूक कारणीभूत असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









