वीजबिलाबाबत तक्रारींचा पाऊस, नागरिकांनी विचारला जाब, अधिकाऱ्यांची सारवासारव
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढीव वीजबिलाच्या तक्रारींचा भडिमार शनिवारी आयोजित हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत करण्यात आला. 50 ते 60 टक्के बिलामध्ये वाढ झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी हेस्कॉमच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकारीवर्गाने केईआरसीच्या नियमावलीनुसार दरवाढ करण्यात आली असून पुढील महिन्यात बिल कमी होईल, असे सांगत सारवासारवीचा प्रयत्न केला.
महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमकडून तक्रार निवारण बैठकीचे आयोजन केले जाते. शहरातील रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालयात उपकेंद्र 1 व 2, नेहरुनगर येथील कार्यालयात उपकेंद्र 3 व ग्रामीण उपकेंद्र 1 तर गांधीनगर येथील कार्यालयात ग्रामीण उपकेंद्र 2 विभागातील बैठका झाल्या. साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करुर, संजीव हम्मण्णवर, कार्यकारी अभियंते एम. टी. अप्पण्णवर यांनी बैठका घेतल्या.
जून महिन्याच्या वीजबिलामध्ये दुप्पट वाढ करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. ज्या नागरिकांचे भरमसाट वीजबिल आले आहे, त्यांच्या मीटरची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले. आलेल्या ग्राहकांना दरवाढ का झाली, यासंदर्भातही स्पष्टीकरण देण्यात आले. केईआरसीने केलेल्या दरवाढीबरोबरच दोन महिन्यांचे वाढीव बिल एकाच महिन्यात आल्याने बिल वाढल्याचे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वीजबिल का वाढले? याबाबत अधिकाऱ्यांनी सारवासारव केली. संतापलेल्या नागरिकांनी मात्र अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर सिद्धू अंगडी, कळ्ळीमनी, हैबत्ती, बेळीकट्टी यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.