मडगाव पालिकेच्या तपासणीवेळी प्रकार उघड
मडगाव : शेतात आणि साळ नदीत सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांसंदर्भात मडगाव पालिकेने शुक्रवारी सायंकाळी चिंचाळ, शिरवडे येथील सर्व ठिकाणांची तपासणी केली असता एका जागेत जागामालकाने 30 ते 35 झोपडीवजा घरे उभारून भाडेपट्टीवर दिली असल्याचे आणि या झोपड्यांमध्ये राहणारे आपले सांडपाणी सरळ जवळच्या नाल्यात सोडत असल्याचे दिसून आले. तसेच येथील दोन सुलभ शौचालयांचे सेप्टिक टँक भरून वाहत असून हे सांडपाणी जवळच्या शेतात तसेच पुढे साळ नदीत जाऊन नदी दूषित होत असल्याचे या तपासणीत आढळून आले. ही तपासणी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या कोअर कमिटीच्या अंतर्गत सुरू आहे. 27 रोजी उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. या तपासणीच्या वेळी उच्च न्यायालयात जनहितपर याचिका गुदरलेले याचिकादार आंतोनियो आल्वारीस, मडगाव पालिकेचे सेनिटरी निरीक्षक संजय सांगेलकर उपस्थित होते. या तपासणीचा अहवाल तयार करण्यात येणार असून बेकायदा झोपड्या उभारलेल्या जमीनमालकाला पालिकेकडून नोटीस बजावली जाईल, असे सेनिटरी निरिक्षक सांगेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









