लसीकरण वा आरटीपीसीआर दाखल्याची सक्ती
प्रतिनिधी /काणकोण
माजाळी चेकनाक्यावर गोव्यातील नागरिकांची अडवणूक केल्यामुळे गोव्यातून कारवार, माजाळी तसेच अन्य भागांत वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱया नागरिकांची खूप गैरसोय झाली. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतला असला, तरी त्याची माहिती गोव्यातील नागरिकांना देखील कळायला हवी होती, असे मत यावेळी चेकनाक्यावर गेलेले काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, नगरसेवक रमाकांत गावकर, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी आणि अन्य नागरिकांनी व्यक्त केले.
या ठिकाणी गोव्यातील बरेच प्रवासी अडकून पडले आहेत याची खबर मिळताच आपण या ठिकाणी धावून आल्याची माहिती भंडारी, रिबेलो यांनी दिली. कोरोनाच्या लसीकरणाचे दाखले त्याचप्रमाणे आरटीपीसीआर चाचणीचे दाखले दाखविण्याची सक्ती चेकनाक्यावरील पोलीस तसेच अन्य अधिकाऱयांनी केली आहे. कोरोनाच्या एसओपीची कारणे दाखवून गोव्यातील नागरिकांची अडवणूक करण्याचा प्रकार या ठिकाणी सध्या चालू झाला असून याबाबतीत गोवा तसेच कर्नाटक सरकार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंगळवारी दुपारी 1 पासून ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. या चेकनाक्यावर उजेडाची सोय नसल्यामुळे अंधाराचा सामना करत प्रवाशांना थांबावे लागले.








