Radhanagari Chakrashwarwadi : सुधाकर काशीद,कोल्हापूर
राधानगरी तालुक्यातल्या चक्रेश्वरवाडीत अनेक शिळा या क्षणी जागोजागी पडल्या आहेत.त्यावर गूढ स्वरूपाचे कोरीव आकार आहेत.काही आकृत्या आहेत.त्याचे थेट अर्थ लागत नसले तरी त्याला दैवताचे रुप मानले गेले आहे.एक प्राचीन धार्मिक ठिकाण म्हणून चक्रेश्वरवाडीचे वेगळे महत्व त्यामुळे आहे. पण चक्रेश्वरवाडीच्या या कोरीव रेखाटन असलेल्या शिळात खगोलशास्त्रीय, भूगर्भशास्त्रीय काही संकेत दडले आहेत.आणि त्यावर आता अभ्यास चालू झाला आहे.काही धार्मिक शिळा व त्यावरील रेखाटनात दडलेल्या या प्राचीन संकेतांचा उलगडा झाल्यास या परिसराचे धार्मिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व आणखी अधोरेखित होणार आहे.
ज्येष्ठ अभ्यासक सचिन पाटील यांनी यासंदर्भात चक्रेश्वरवाडी परिसरावर अभ्यास केंद्रित केला आहे.त्यांच्या मते चक्रेश्वरवाडीला एक धार्मिक वारसा जरूर आहे.पण खगोलशास्त्रीय निरीक्षण व भूगर्भातील घडामोडीचा अभ्यास करण्याचेही ते योग्य ठिकाण आहे.आणि त्या परिसरात असलेली भग्न किंवा थोडी चांगल्या अवस्थेतील शिल्प किंवा दगडावर कोरलेल्या गूढ आकृत्या म्हणजे त्या काळातील सांकेतिक नोंदी किंवा संकेत खूणा आहेत.
राधानगरी तालुक्यात चक्रेश्वरवाडी हे गाव आहे. या गावात चक्रेश्वराचे मंदिर आहे. त्यापासून काही अंतरावर उघडय़ावर एक प्राचीन मंदिर व तेथे अनेक दगडी शिळा आहेत.त्यावर चक्रांकित आकृती आहेत.काही शिवलिंग आहेत. त्याची रचनाही थोडी वेगळी आहे.एक विहीर आहे व आसपास अनेक भग्न विरगळी व दगडी शिळा मांडून ठेवलेल्या आहेत.ही सारे शिल्पे अश्मयुगीन कालीन म्हणजे इसवी सन पूर्व काळातील आहेत. त्या काळात लिखित अशी कोणतीही लिपी किंवा भाषा नव्हती.त्यामुळे चित्रांच्या माध्यमातूनच ती दगडी कातळावर नोंद करून ठेवली जात होती.त्याच नोंदी चक्रेश्वरवाडीत आहेत. म्हणजे अतिशय प्राचीन असा ठेवाच या चक्रेश्वरवाडी परिसराने जपला आहे.या अभ्यासाबद्दल सचिन पाटील यांनी सांगितले की,अशा दगडी शिळावरील कातळावरील आकृत्या म्हणजे सांकेतिक लिखाण आहे. त्याचा अभ्यास मी करत आहे.कोल्हापूर सांगली कोकणातील काही भागात अशा शिळा आहेत. त्याच्या अभ्यासानंतर आजवर दडलेले खूप काही वेगळे संदर्भ पुढे येतील. कोल्हापूर जिह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वर वाडीला मी या दृष्टीनेच अभ्यासाचा एक चांगला ठेवा मानतो.
हेही वाचा- गुढ वेताळ आणि त्याचा पालखी सोहळा
प्राचीन अस्सल पुरावा..
चक्रेश्वरवाडीच्या टेकडीवर दिसणारे अवकाश धूळ व धूर विरहित आहे.अतिशय स्वच्छ असे अवकाश येथून पाहायला मिळते.तसेच भूगर्भातील काही घडामोडींचा अभ्यास करण्यासाठीही तेथील वातावरण पूरक आहे.अर्थात खूप प्राचीन काळात कदाचित या अंगानेही या दगडी कातळावर काही सांकेतिक नोंदी केल्या गेल्या असतील.त्यामुळे चक्रेश्वर वाडी हा प्राचीन कालखंडाचा एक अस्सल पुरावा आपल्या कोल्हापूर जिह्यात आहे.शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रामार्फत या सप्ताहात तेथून अवकाश दर्शनही केले जाणार आहे.
सचिन पाटील, आर्किऑलॉजिस्ट.
पर्यटनस्थळ यादीत समावेश…
पर्यटन केंद्र म्हणजे जंगल,समुद्र,बीच हॉटेल नव्हेत.तर,जेथे प्राचीन संदर्भ दडले आहेत.त्या ठिकाणीही पर्यटक गेले पाहिजेत.जिह्यातील पर्यटन स्थळांची यादृष्टीने यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.आम्ही असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट कोल्हापूर,यांच्या वतीने चक्रेश्वरवाडीचा समावेश पर्यटनस्थळाच्या यादीत करणार आहे.
अजय कोराणे, विजय कोराणे.