आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार : विज्ञानसाहित्यात मोठे योगदान
पुणे / प्रतिनिधी
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञाान लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी मंगळवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. त्यांच्यामागे तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. डॉ. नारळीकर यांना कोणतेही दीर्घ आजारपण नव्हते. मात्र, वयोमानानुसार त्यांची प्रकृती काहीशी खालावली होती. झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगी अमेरिकेतून आल्यावर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव आयुका येथे सकाळी 11 वाजता ठेवण्यात येणार आहे.
कोल्हापूर जन्मस्थळ
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक सन्मान त्यांनी मिळवले.
डॉ जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि पद्मविभूषण’ हा सर्वोच्च सन्मानदेखील मिळाला. परंतु, केवळ संशोधन क्षेत्रात कार्यरत न राहाता त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा प्रसार केला.
विज्ञानसाहित्यात योगदान
‘अंतराळातील भस्मासूर’, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची काही गाजलेली विज्ञानवादी पुस्तके. ‘चार नगरांतले माझे विश्व”या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गऊडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची पुस्तकेही रसिकप्रिय ठरली. तर चार नगरांतले माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. नाशिक येथे झालेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. .
थोर खगोलशास्त्रज्ञ : डॉ.किरण ठाकुर यांची आदराजंली
डॉ. जयंत नारळीकर हे थोर खगोलशास्त्रज्ञ होते. खगोल संशोधनात त्यांनी नाव मिळवले. बेळगावशी त्यांचे जवळचे नाते होते. आमच्या कॉलेजमध्येही ते येऊन गेले होते. ते अस्खलित मराठीतून बोलायचे, लेखन करायचे. त्याचबरोबर मराठीतून सहजपणे विज्ञान संवाद साधायचे. मराठीत बोलणारे खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याबद्दल समस्त मराठीजनांना अभिमान वाटायचा. खगोलशास्त्रातील संशोधनामुळे त्यांनी सबंध जगात नावलौकिक मिळवला, अशा शब्दांत ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी डॉ. नारळीकर यांना आदरांजली वाहिली.








